अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे प्रतिपादन : ‘लोकमान्य कल्चरल’च्या बोधचिन्हाचे लोकार्पण
पुणे : मराठी भाषेचा सर्वांगीण विकास व्हावा आणि सर्व कलांना वाव मिळावा, याकरिता ‘लोकमान्य कल्चरल फाऊंडेशन’सारख्या संस्थांची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्या व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी येथे व्यक्त केले. विजयादशमीच्या मुहूर्तावर लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या बोधचिन्हाचे लोकार्पण मृणाल कुलकर्णी व लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. फाऊंडेशनच्या कार्यकरिणीत समावेश करण्यात आलेले आभा औटी, मृण्मयी मोहन, सुनील महाजन, किरण केंद्रे, रघुनंदन लेले, मुकुल मारणे आदी यावेळी उपस्थित होते.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, कला, साहित्य, नृत्य, संगीत यावर आधारित कार्यक्रम करताना नवीन कलाकृती रसिकांसमोर आणण्यास या फाऊंडेशनची नक्कीच मदत होणार आहे. किरण ठाकुर म्हणाले, महाराष्ट्रातील लुप्त होऊ लागलेल्या लोककला आणि साहित्यकृतींना आपण एक चांगला मंच देऊ तसेच संगीत, नृत्य, कला, साहित्य या विषयांवरील कार्यशाळा आणि उपक्रमांचे लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजन करू, अशी ग्वाही फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्वैता उमराणीकर यांनी, तर आभार किरण केंद्रे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन मुकुल मारणे यांनी केले.








