वाढत्या मागणीची नेंद विविध अहवालामधून स्पष्ट
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणि संख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सची संख्या वाढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच देशात आतापर्यंत 5,254 सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशन्स स्थापन केली असल्याचे ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नोडल एजन्सी असलेल्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी यांनी सांगितले आहे.
वाहन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, देशात एकूण ईव्हीची संख्या 20.65 लाखांहून अधिक आहे. गेल्या वर्षी 10 लाख ईव्हीची विक्री झाली
आहे. म्हणजेच सध्याला 393 इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहे. जगभरात या तुलनेत पाहता सरासरी 10 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स आहेत. चीनमध्ये हे प्रमाण 7 आहे. काउंटरपॉईंट या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, 2030 पर्यंत देशात सुमारे 20.5 लाख सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता असू शकते आणि त्यांना स्थापित करण्याचा वेग 9 पट वाढविण्याची आवश्यकता असल्याचे भाकीतही यावेळी केले आहे.
कर्नाटकात चार्जिंग स्टेशन, यूपीमध्ये इलेक्ट्रिक वाहने सर्वाधिक ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकमध्ये देशातील सर्वाधिक 774 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र 660, दिल्ली 539 आणि तामिळनाडू राज्यात 442 स्टेशन्स आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 4.55 लाख नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांसह 406 सार्वजनिक चार्जर्सची संख्या देशात सर्वाधिक आहे.
पायाभूत सुविधा असल्यास विक्री वाढेल : गिल
सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे महासंचालक सोहिंदर सिंग गिल म्हणाले, देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. या तुलनेत सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सची संख्या खूपच कमी आहे. सार्वजनिक चार्जिंगची चांगली पायाभूत सुविधा असल्यास, ईव्ही., विशेषत: कारच्या विक्रीत आणखी वाढ होणार असल्याचीही शक्यता मांडली आहे.









