उद्योजक, आयटी कर्मचाऱ्यांची मागणी : लोकप्रतिनिधींविरोधात नाराजी
बेळगाव : धारवाड-बेंगळूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. परंतु, या एक्स्प्रेसचा बेळगावला काडीचाही फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जोपर्यंत बेळगावपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस येणार नाही, तोपर्यंत बेळगावमधून धारवाडपर्यंत लिंक सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नेहमीच बेळगावला डावलणाऱ्या लोकप्रतिनिधींनी किमान एवढी तरी मागणी पूर्ण करावी, अशी विनंती प्रवाशांनी केली आहे. प्रवासामध्ये गती यावी व वेळ कमी व्हावा या उद्देशाने वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. धारवाड-बेंगळूर या मार्गावरही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली. वंदे भारत एक्स्प्रेस तांत्रिक कारणाने बेळगावपर्यंत पोहोचणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
नैर्त्रुत्य रेल्वे तसेच लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळेच बेळगावला वंदे भारत एक्स्प्रेसपासून वंचित रहावे लागले. यामुळे लोकप्रतिनिधींविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बेंगळूर ही राज्याची राजधानी आहे. त्याचबरोबर एक आयटी हब म्हणूनही शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे बेळगाव तसेच परिसरातील शेकडो तरुण-तरुणी शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीनिमित्त बेंगळूरला ये-जा करत असतात. धारवाडमधून अवघ्या सहा तासांमध्ये बेंगळूर गाठता येत असल्याने या एक्स्प्रेसला मागणी अधिक आहे. तिकीट दर अधिक असला तरी प्रवासाचा कालावधी कमी झाल्याने बेळगावमधूनही या रेल्वेला कनेक्टिव्हिटी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. पहाटे 5.45 वाजता बेंगळूरमधून निघालेली एक्स्प्रेस दुपारी 12.10 मिनिटांनी धारवाडला पोहोचते. तर दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी धारवाडमधून निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस सायंकाळी 7.45 वाजता बेंगळूरला पोहोचते. या वेळेनुसार बेळगावमधून सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. बेळगावमधून निघणारी एक्स्प्रेस वंदे भारतला लिंक असावी. त्यामुळे ही एक्स्प्रेस आल्यानंतरच वंदे भारत एक्स्प्रेस निघेल, अशी सोय करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
कोकणात शक्य तर बेळगावात अशक्य का?
धारवाडमधून बेळगावपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस आणण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याचे कारण लोकप्रतिनिधींनी दिले आहे. परंतु, हे कारण न पटणारे आहे. कारण कोकणातील डोंगराळ भागातून मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस धावू शकते तर बेळगावातून तिला धावण्यास कसली अडचण आहे, हे अनाकलनीय आहे. एकीकडे बेळगावला उपराजधानी म्हणायचे आणि दुसरीकडे तिचा उपहास करायचा, हा करनाटकीपणा जनतेने आता ओळखला आहे.









