आर. व्ही. देशपांडे यांचे प्रतिपादन : सारस्वत चैतन्य गौरव सोहळा
प्रतिनिधी /बेळगाव
सारस्वत समाज काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरला आहे. प्रत्येक क्षेत्रात समाजातील व्यक्ती अग्रेसर आहेत. कला, वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, क्रीडा, संगीत क्षेत्रात अनेकांनी नाव कमावले असून, त्यांचा सारस्वत चैतन्य गौरव सोहळय़ांतर्गत सत्कार केला. परंतु शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही समाजाने भरीव कामगिरी करावी, अशी अपेक्षा माजी मंत्री व हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी व्यक्त केली.
सारस्वत प्रकाशन आयोजित 22 वा ‘सारस्वत चैतन्य गौरव सोहळा’ रविवारी विद्याधिराज सभागृह येथे पार पडला. यावेळी माजी मंत्री देशपांडे बोलत होते. व्यासपीठावर अभियंता आर. डी. शानभाग, सारस्वत बँकेचे संचालक किशोर रांगणेकर, सारस्वत प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप भिडे, गौड सारस्वत ब्राह्मण समाज शहापूरचे अध्यक्ष दिलीप तिळवे, बेळगाव पर्तगाळी मठाचे अध्यक्ष बाळकृष्ण पै, सारस्वत प्रकाशनचे विश्वस्त प्रमोद तेंडोलकर यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
देशपांडे म्हणाले, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगात काय सुरू आहे, याचा वेध घेऊन सारस्वत समाजाने काम करावे. आपण समाजात काम करतो, त्यामुळे समाजाचे ऋण आपण आपल्या कामातून फेडायचे असतात. फक्त पैसा मिळविला याला महत्त्व नसून समाजासाठी काय केले हे महत्त्वाचे असते. समाजात एकजूटही तितकीच महत्त्वाची असून समाज एकजूट राहिला तरच त्याचा विकास होतो, असे विचार त्यांनी मांडले.
सत्काराला उत्तर देताना मान्यवरांनी आयोजकांचे आभार मानले. राहुल साखळकर यांनी सरस्वती प्रकाशन व सारस्वत चैतन्य या विषयी तर सारस्वत चेंबरचे संचालक सिद्धार्थ सीनकर यांनी उद्योग व व्यवसायाशी संबंधित माहिती दिली. कार्यक्रमाला एनकेजीएसबी बँकेचे संचालक शशिकांत गुळगुळे, गौड सारस्वत ब्राह्मण समाज शहापूर, बेळगाव श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
निव्वळ योगायोग
पुरस्कारप्राप्त विजया तेलंग या मूळच्या हल्याळच्या असल्याने त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. हल्याळमधून एम. ए. केल्यानंतर पहिला सत्कार आर. व्ही. देशपांडे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर पीएच.डी.नंतरही त्यांच्याच हस्ते सत्कार झाला होता. आज अनेक वर्षांनंतर पुन्हा आमदार देशपांडे यांच्याच हस्ते सत्कार होत असून, हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. ज्या भागामध्ये लहानाची मोठी झाले तेथील एका दिग्गज व्यक्तीच्या हस्ते सन्मान स्वीकारल्याने हा माहेरच्या लोकांनी सन्मान केल्याची भावना विजया तेलंग यांनी व्यक्त केली.









