प्रवाशांची लुबाडणूक थांबविणे शक्य : जागा उपलब्ध करून देणे आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानक परिसरात प्रीपेड रिक्षास्टँड पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी प्रीपेड रिक्षास्टँड गरजेचे आहे. नव्या स्मार्ट रेल्वे स्थानकात रिक्षास्टँडसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांचीही सोय होणार आहे.
रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण केले जात असून, नोव्हेंबरअखेर काम पूर्ण होण्याची शक्मयता आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वेस्थानकात पे ऍण्ड पार्किंगची व्यवस्था सुरू करण्यात आली. यामुळे वाहनचालकांची सोय झाली आहे. आता प्रिपेड रिक्षास्टँड सुरू केल्यास प्रवाशांची लुबाडणूक थांबविता येईल. 2015 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांच्या हस्ते प्रीपेड रिक्षास्टँडचे उद्घाटन झाले होते. काही दिवस रिक्षास्टँड सुरू राहिले. परंतु मध्यंतरी ते पुन्हा बंद पडले. माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून सुरू झालेले प्रीपेड रिक्षास्टँड कोरोना काळात पुन्हा बंद झाले.
या दरम्यान रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याने रिक्षास्टँडसाठी जागा उपलब्ध नव्हती. आता रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होत आले असून रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनापूर्वी प्रीपेड रिक्षास्टँड पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.
प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत असून, ये-जा करण्यासाठी रिक्षाची आवश्यकता लागते. परंतु बऱयाच वेळा काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांची फसवणूक होते. प्रवाशांकडून मनमानी दर आकारला जात असून, यामुळे प्रीपेड रिक्षास्टँड सुरू झाल्यास हे प्रकार थांबविता येणार आहेत.









