उद्योजक-शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक होत नसल्याने अडचण
बेळगाव : बेळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात फौंड्री उद्योग आहे.त्याचबरोबर लहान व मोठ्या उद्योगांची संख्याही वाढत असताना बेळगावमधून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्गो सेवा उपलब्ध नसल्याने उद्योजकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. सध्या केवळ एकच विमानातून कार्गो वाहतूक होत असल्याने पुरेशा प्रमाणात सोय झालेली नाही. बेळगाव जिल्हा औद्योगिक क्षेत्राबरोबर कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. मागील काही वर्षात कार्गो वाहतूक वाढावी, अशी मागणी उद्योजकांकडून होत होती. यापूर्वी मुंबई, बेंगळूर, हैद्राबाद या ठिकाणाहून विमानाने बेळगावला कार्गो सेवा मिळत होती. परंतु, अनेक विमानफेऱ्या बंद झाल्यामुळे कार्गो वाहतूक बंद पडते की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. बेळगावमध्ये लहान-मोठे एक हजारहून अधिक कारखाने आहेत. या कारखान्यांमधून फौंड्री कास्टींग, हैड्रोलिक्स, ऑटोमोबाईल क्षेत्रातील स्पेअरपार्ट, त्याचबरोबर विमानांचे भाग तयार करण्यात येतात.
बेळगावमध्ये नवीन टर्मिनल बिल्डींग उभारली जात असल्याने त्याबरोबरच कार्गो वाहतूक वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. हुबळीमधून सुरू असलेल्या कार्गो वाहतुकीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यापेक्षाही बेळगावमधून प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. मध्यंतरी कृषी कार्गो सुरू करण्याची परवानगीही विमानतळाला मिळाली असल्याने शेतकऱ्यांनाही कार्गो वाहतुकीची प्रतीक्षा आहे. सध्या बेळगाव विमानतळावरून बेळगाव-दिल्ली दरम्यान कार्गो वाहतूक केली जात आहे. वर्षाकाठी 40 मेट्रिक टन कार्गोची वाहतूक केली जात आहे. जर विमानांची संख्या वाढल्यास ही वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार असून त्याचा फायदा बेळगावमधील उद्योगांना होणार आहे.









