मडगाव : भारतात अधिकाधिक ग्रासरूट पातळीवरील फुटबॉल स्पर्धांची आवश्यकता आहे आणि या दिशेने ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशन करत असलेल्या प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत, असे भारताचे माजी फुटबॉलपटू बायचुंग भुटिया आणि सुब्रोतो पॉल यांनी नमूद केले. राय पंचायत मैदानावर झालेल्या ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिप फुटबॉल 2025 राष्ट्रीय अंतिम सामन्यांना या दोघांनी उपस्थिती लावली होती. ‘आमचा देश खूप मोठा आहे. अशा प्रकारच्या अधिक ग्रासरूट पातळीवरील स्पर्धांची फुटबॉलच्या विकासार्थ गरज आहे. ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशनने 17 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा सुरू करून एक चांगले काम केले आहे. पुढील काही वर्षांत ही स्पर्धा भारतातील सर्वांत मोठी ग्रासरूट फुटबॉल स्पर्धांपैकी एक होऊ शकते, असे बायचुंग भुटिया म्हणाला. माझ्या स्वत:च्या बायचुंग भुटिया फुटबॉल स्कूल्सने ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशनसोबत भागीदारी केली आहे.
त्यांच्या प्रायोजन कार्यक्रमांमुळे आमच्या तिघा खेळाडूंनी तीन वर्षांत भारताचे प्रतिनिधीत्व केले असल्याचे भुटिया म्हणाला. 13 व 15 वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या गटांमध्येही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा झाल्या पाहिजेत. सुदैवाने ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशन याची शक्यता तपासण्यास उत्सुक आहे, असेही भुटिया म्हणाला. मोबाईल फोन एक मोठं व्यत्यय आहे. आपणाला मजबूत फुटबॉल राष्ट्र व्हायचं असेल, तर अधिक मुलांनी मोबाईल फोन बाजूला ठेवून फुटबॉल खेळायला मैदानावर यावे लागेल. मी देखील पालक आहे, त्यामुळे या गोष्टींतील अडचणी मला समजतात. मुलं फुटबॉल खेळत नाहीत, तोपर्यंत आपल्याकडे निवडीसाठी पुरेसं टेलंट कधीच तयार होणार नाही, असे भुटिया म्हणाला. भारतात खूप तरूण आणि प्रतिभावन गोलकीपर्स आहेत. यात झारखंड फुटबॉल असोसिएशनच्या संघातील अनिषा ओरांव ही विशेषत: खूप सक्षम आहे, असे गोलकीपिंग टेलंटबद्दल विचारल्यावर भारताचा माजी गोलरक्षक सुब्रोतो पॉल म्हणाला.









