युएनजीए अध्यक्ष साबा कोरोसी यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेतील सुधारणांवरून संयुक्त राष्ट्रसंघ महासंघाचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी भारतासंबंधी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सुरक्षा परिषदेत भारतासारख्या प्रभावी प्रतिनिधींची गरज असल्याचे कोरोसी यांनी म्हटले आहे.
सुरक्षा परिषदेचा वारसा आम्हाला काही दशकांपूर्वी मिळाला आहे. सुरक्षा परिषद विविध महाशक्तींसोबत वेगवेगळे मार्ग अन् शक्तीचे संतुलन दर्शविते. सुरक्षा परिषदेच्या स्थापनेवेळी भारताने याचे सदस्यत्व स्वीकारणे टाळले होते. परंतु सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी भारत आता पूर्णपणे पात्र असल्याचे कोरोसी म्हणाले.
सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांदरम्यान एक उत्कृष्ट प्रतिनिधीची गरज असल्याची धारणा आहे. शांततेसाठी मोठी जबाबदारी असलेल्या देशांचाही यात समावेश आहे. लोकांचे कल्याण करण्याची मोठी जबाबदारी असून निश्चितपणे भारत विश्वकल्याणात योगदान देऊ शकतो. सुरक्षा परिषदेत सुधारणा घडवून आणण्याची चर्चा 13 वर्षांपासून सुरू आहे. याचमुळे ज्या सदस्य देशांच्या हातात याचे नियंत्रण आहे, त्यांनी यावर त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे. सुरक्षा परिषदेतील सुधारांकरता भारत सक्रीय असल्याचे कोरोसी यांनी नमूद केले आहे. काही महिन्यांपूर्वी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो. या भेटीदरम्यान मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला असल्याचे ते म्हणाले.









