राज्यात आज 76 वा क्रांतिदिन समारोह : मुख्य सोहळा पणजीतील आझाद मैदानावर,विद्यालये, संस्थांसह राजभवनातही आयोजन
प्रतिनिधी /पणजी
राज्यात आज सर्वत्र 18 जून क्रांतिदिन साजरा करण्यात येईल. त्याचबरोबर गोवा मुक्ती सत्याग्रहात जे शूरवीर स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले त्या सर्वांना अभिवादन केले जाणार आहे.
मुख्य सोहळा पणजीत आझाद मैदानावर राज्यपाल श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. आझाद मैदानावरून राज्यातील जनतेला व शाळकरी मुलांना उद्देशून दोन्ही नेते संबोधणार आहेत. यावेळी गोवा मुक्ती आंदोलनातील काही हयात स्वातंत्र्यसेनानी तसेच स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक आणि इतर अनेक नागरिक उपस्थित रहातील. हा कार्यक्रम सकाळी 8.45 वा. होईल. त्यानंतर आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे.
राजभवनवर देखील क्रांतिदिनाचा कार्यक्रम आखण्यात आला असून तो सायंकाळी 4 वा. होणार आहे. तसेच काही स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार केला जाणार आहे. गोव्यातील विविध शाळांमधून देखील क्रांतिदिन कार्यक्रम होणार आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिक्रिया
गोवा क्रांतिच्या 76 व्या वर्षात आपण यंदा पदार्पण करीत आहोत. अद्याप गोवा मुक्ती लढय़ातील काही स्वातंत्र्यसैनिक हयात आहेत व त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आज आम्ही इथे देत आहोत.
गरज वैचारिक-शैक्षणिक क्रांतिची
गोव्यात आता विविध क्षेत्रात क्रांति झालेली आहे आता गरज आहे वैचारिक क्रांतिची. या राज्याचा प्रवास सकारात्मकरित्या पुढे केला जाईल. सकारात्मकरित्या गोव्याच्या विकास कसा होईल आणि शैक्षणिक क्षेत्रातही गोवा कसा गगन भरारी घेईल या उद्देशाने आता गरज आहे वैचारिक क्रांतिची.
संस्काराचे बाळकडू बालकांना शाळांमधून मिळावे, घरांतून मिळावे सुसंस्कारित मुलेच देशाची भवितव्य पुढे ठरवितील. शिक्षण हा भविष्याचा पाया आहे. वैचारिक क्रांति करताना शिक्षण क्षेत्रातील क्रांति आवश्यक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी काल शैक्षणिक क्रांतिचे सुतोवाच केलेले आहे. आजच्या क्रांतिदिनानिमित्त गोमंतकीय जनता शिक्षण आणि वैचारिक क्रांतिच्या दिशने पुढे पाऊल टाकतील अशी अपेक्षा आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिक्रिया
गोव्याचा इतिहास युवा पिढीला कळायला हवा

शाळेत असतानाच आम्हाला स्वातंत्र्याचे धडे मिळाले. परंतु आताच्या पिढीला गोव्याच्या इतिहासाबद्दल काहीच माहिती नसल्याचे पाहून दुःख होते. गोव्याच्या शालेय अभ्यासक्रमात गोव्याच्या इतिहासाचा समावेश नाही. बाहेरचा इतिहास कशाला हवा अशी विचारधारणा युवापिढीची आहे. मंत्री, नेते गोव्याचा इतिहास युवापिढीला कळावा यासाठी काहीच करत नाही. गोव्याचा इतिहास आजच्या पिढीकडे पोहचणे आवश्यक आहे.
– शारदा सावईकर, मिरामार
स्वातंत्र्यसैनिकांना मिळते कमी प्रमाणात किंमत

सध्या स्वातंत्र्यसैनिकांना कमी प्रमाणात किंमत दिली जाते. गोव्यात अनेक सरकारे झाली. पूर्वी स्वातंत्र्यदिन, क्रांतिदिन, गोवा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रण दिले जात होते. परंतु मागील काही वर्षापासून स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रण दिले जात नाही. प्रत्येक स्वातंत्र्यसैनिक अशा कार्यक्रमांना एक स्मृती घेऊन हजेरी लावतात. परंतु आम्हाला कुणीच किंमत देत नाही.
– प्रभाकर नाईक, कासरपाल
स्वातंत्र्यसैनिकांना मिळत नाहीत साधनसुविधा

गोव्याची परिस्थिती एकदम बिकट झाली आहे. स्वातंत्र्यलढय़ावेळी गोव्यात काहीतरी बदल होईल, यासाठी लढलो. परंतु सध्या लोकशाहीने कुठल्याच गोष्टी होत नाहीत. 18 जून, 15 ऑगस्ट, 19 डिसेंबरच्या कार्यक्रमांत स्वातंत्र्यसैनिकांचा उदोउदो केला जातो आणि नंतर आमच्याकडे कुणीच पाहत नाही. स्वातंत्र्यसैनिकांना साधनसुविधा मिळत नाहीत. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुणालाच वेळ नाही.
– रोहिदास देसाई, ताळगाव
स्वातंत्र्यलढा आजच्या मुलांना कळायला हवा

क्रांतिदिनाच्या लढयातील सर्व घडामोडी मी पाहिल्या आहेत. परंतु आता या क्रांतीदिनाचे महत्त्व कमी होत आहे. सरकारी पातळीवर क्रांतिदिन साजरा केला जातो, परंतु त्यानंतर सगळे विसरले जाते. अभ्यासक्रमात गोव्याच्या इतिहासाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्याच्या पिढीला या इतिहासाबद्दल काहीच माहिती नाही, ती त्यांना द्यायला हवी.
-गुरूदास कुंदे
स्वार्थी राजकारण्यांमुळे गोवा झाला दिशाहीन

18 जूनच्या क्रांतिमुळे गोवा प्रकाशमय झाला. त्यानंतर अनेक सरकारे आली गेली. गोव्याला जी दिशा देणे गरजेचे होते ती दिशा कुठल्याच सरकारने दिली नाही. गोवा दिशाहीन झाले आहे. राजकारण्यांच्या अरेरावीच्या वृत्तीमुळेच गोवा दिशाहीन झाले आहे. लहानशा गोव्यात बदल घडविण्यासाठी पुष्कळ गोष्टी करण्याजोग्या आहेत. परंतु त्याप्रकारे होत नाही.
– नागेश करमली, पणजी
स्वातंत्र्यामुळे चांगले दिवस पाहण्याची संधी मिळाली

स्वातंत्र्यानंतर सर्वत्र शाळा सुरू झाल्या. त्यामुळे सर्वसामान्य माणूस शिक्षण घेऊ लागला. सरकारी तसेच खासगी कंपन्यांत नोकरी करत आहे. अनेक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. खरे जीवन आम्ही आज जगत आहोत. मात्र स्वातंत्रसैनिकाच्या मुलांना अजून काही प्रमाणात नोकऱया नाहीत. त्यांना सरकारने नोकरी द्यावी. 2021 मध्ये सरकारने पेन्शनात वाढ केली. पण 8 महिने उलटले, तरी मला ते मिळालेले नाही.
– वसंत बुधलकर, ओरेल, असोळणे
18 जूनची क्रांति म्हणजे गोवा मुक्तीचा अंतिम टप्पा

18 जून 1946 रोजी क्रांतिची सुरुवात झाली. ती घटना मुक्तीलढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांमध्ये चेतना जागवणारी होती. पोर्तुगीजांनी स्वातंत्र्यसैनिकांविरोधात कठोर धोरण अवलंबल्याने माझ्यावर घरातून व अन्य पातळय़ांवरून दबाव वाढू लागल्याने मी गोवा सोडून मुंबईतून मुक्ती चळवळीचे कार्य केले. भारत सरकारने पोर्तुगीज विरोधात कारवाई करावी यासाठी तेथून आमचे प्रयत्न सुरु होते. तब्बल 12 वर्षे मुंबईच्या वास्तव्यात मडगावच्या क्रांती पर्वानंतरचा हा कालखंड म्हणजेच मुक्तीचा अंतिम टप्पा होता.
रोहिदास नाईक, फोंडा









