पाच वाजेपर्यंत 57.89 टक्के : काही ठिकाणी आप-भाजप समर्थकांमध्ये हाणामारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी बुधवार, 5 फेब्रुवारी 2025 रोजी मतदान झाले. सायंकाळपर्यंत झालेल्या मतदान प्रक्रियेत जवळपास 60 टक्के मतदारांनी सहभाग घेतल्याने स्पष्ट झाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57.89 टक्के मतदानाची नोंद झाली होती. मतदानाची वेळ 6 वाजेपर्यंत निर्धारित असल्याने त्यानंतरही मतदान प्रक्रिया सुरू होती.
दिल्लीतील निवडणुकीत 699 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. आता शनिवार, 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पार्टी (भाजप), काँग्रेस आणि इतर अनेक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. ‘आप‘ने सर्व 70 जागांवर उमेदवार दिले आहेत. भाजपने 68 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, तर दोन जागा मित्रपक्षांना दिल्या आहेत. काँग्रेसनेही सर्व 70 जागांवर निवडणूक लढवली आहे.
दिल्लीत दुपारी 3 वाजेपर्यंत 46.4 टक्के मतदान
कडक सुरक्षा बंदोबस्तात आणि प्रशासकीय नियोजनात सकाळी सात वाजता दिल्लीत मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. निवडणूक आयोगाच्या मते दुपारी 3 वाजेपर्यंत 46.4 टक्के मतदान झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत, मुस्तफाबादमध्ये सर्वाधिक 56.12 टक्के मतदान झाले, तर करोल बाग आणि चांदणी चौक येथे सर्वात कमी 40 टक्के मतदान झाले.
दिग्गजांचे मतदान
दिल्ली निवडणूक 2025 साठी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी लायन्स विद्या वरिष्ठ माध्यमिक विद्यालय मतदान केंद्रावर मतदान केले. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही बुधवारी आपला मताधिकार बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ‘मी प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचे आवाहन करू इच्छितो. मतदान करणे हे आपले संवैधानिक कर्तव्य आहे आणि नैतिक जबाबदारी देखील आहे. आपल्या मतदानाद्वारे आपण आपल्या पसंतीचा प्रतिनिधी निवडू शकतो आणि आपल्या पसंतीचे सरकार बनवू शकतो. म्हणून, मी प्रत्येक मतदाराला मतदान करण्याची विनंती करतो.’ असे ते म्हणाले.
काही ठिकाणी गोंधळ
दिल्लीतील मतदानादरम्यान जंगपुरा येथे गोंधळ उडाला. जंगपुरा येथील आम आदमी पक्षाचे उमेदवार मनीष सिसोदिया यांनी भाजप कार्यकर्त्यांवर एका इमारतीत पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. सिसोदिया येथे पोलिसांशी वाद घालतानाही दिसले. तसेच जंगपुरा येथील मतदान केंद्राबाहेर मनीष सिसोदिया यांच्या विरोधात मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. त्याव्यतिरिक्त सीलमपूरमध्ये काही महिलांनी बुरखा घालून बनावट मतदान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. काही महिला मतदारांचे मतदान झाल्यानंतर आरोप केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला.









