निजामुद्दीन एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गे वळविली
► प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वेमार्गावर दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना करंझोळ नजीक घडली आहे. मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास कॅसलरॉक ते करंजोळ या दोन रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसळली. मातीचा भराव रेल्वे मार्गावर आल्याने तो बाजूला करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू होते. रात्री उशीरापर्यंत माती बाजूला करण्याचे काम सुरू असल्याने गोव्यावरुन बेळगावच्या दिशेने येणारी निजामुद्दीन एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गे वळविण्यात आली.
मागील आठवड्याभरापासून कोकणासह पश्चिम घाटात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी, नाल्यांना पूरस्थिती आली असून घाटमाथ्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. 15 दिवसांपूर्वी दूधसागर नजीक दरड कोसळली होती. यामुळे रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अशीच घटना मंगळवार दि. 25 जुलै रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली. त्यामुळे लोंढा ते वास्को या मार्गावरील दरड कोसळण्याचे सत्र कमी होताना दिसत नाही.
करंजोळ जवळील तिसऱ्या क्रमांकाच्या बोगद्याजवळ ही दरड कोसळली. झाडे व मातीचा भराव मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्गावर कोसळला. यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. गोव्याकडून लोंढ्याच्या दिशेने येणारी वास्को–निजामुद्दीन एक्स्प्रेस बराच काळ कुळे रेल्वे स्थानकावर थांबवावी लागली. जेसीबीने नैऋत्य रेल्वेच्या इंजिनिअर टीमने भराव बाजूला करण्याचा प्रयत्न केला. धुवाधार सुरू असलेल्या पावसामुळे या कामामध्ये व्यत्यय येत होता.
प्रवाशांची गैरसोय
दरड कोसळल्या मुळेवास्को निजामुद्दीन एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्ग वळविण्यात आली. यामुळे बेळगावहून पुणे, भोपाळ, दिल्ली येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. रेल्वे स्थानकावर ताटकळत असलेल्या प्रवाशांना अखेर घरी परतावे लागले. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
मुसळधार पावसामुळे दरड कोसळली
दूधसागर परिसरात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे दुपारी 3.50 च्या सुमारास दरड कोसळली. तात्काळ नैऋत्य रेल्वेची इंजिनिअर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली. जेसीबीच्या सहय्याने माती व झाडे दूर करण्याचा प्रयत्न सुरू होता. रात्री उशीरापर्यंत हे काम सुरू असल्याने गोवा एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गे वळविण्यात आली आहे. – अनिश हेगडे-जनसंपर्क अधिकारी नैऋत्य रेल्वे









