कराड: हवामान विभागाच्या वतीने जिल्हय़ात रेड अलर्टचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून पूरस्थिती निर्माण होणाऱ्या तालुक्यात बुधवारी एडीआरएफची (NDRF)पथके पाठवण्यात आली आहेत. कराड (Karad) व पाटण (Patan)तालुक्यांसाठी 25 जवानांची एक एनडीआरएफची तुकडी कराडला दाखल झाली. येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे ही तुकडी उतरली असून गुरूवारी या तुकडीतील जवानांनी शहरात कृष्णा व कोयना नदीकठी पाहणी केली.
पाटण तालुका व कोयना पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी कोयना नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच हवामान विभागाच्या वतीने सातारा जिह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर कराडला एनडीआरएफचे पथक पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा- सांगली जिल्हय़ात रिपरिप, पाणलोट क्षेत्रात मुसळधार
अतिवृष्टीच्या काळात पाटण तालुक्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होते. महापुराबरोबरच पाटण तालुक्यात भुस्खलन होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. तर कृष्णा व कोयना नद्यांना महापूर आल्यानंतर कराड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडतो. अशावेळी पूरस्थिती निर्माण झाली तर पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा व तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती सज्ज झाली आहे. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी कराडमध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफच्या तुकडीमध्ये 3 अधिकारी आणि 22 जवान आहेत. तसेच त्यांच्याकडे 4 रबरी बोटी, लाईफ जॅकेट्स आहेत.
Previous Articleइचलकरंजी महापालिकेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
Next Article पावसाळ्यात सापांपासून राहा सावधान !









