रायगड : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने जोर धरला आहे. दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे पूरपरिस्थितीसह दरडीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या आपत्तीच्या काळात मदत आणि बचावकार्य तातडीने सुरु करण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये एनडीआरएफ दल दाखल झाले आहेत. महाड येथे हे दल तळ ठोकून आहे. मान्सून संपेपर्यंत हे पथक महाड येथे राहणार असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
३ जून २०२० मध्ये झालेल्या निसर्ग चक्री वादळाचा फटका जिल्ह्याला बसला होता. त्यानंतर महाड व पोलादूपर तालुक्यात २०२१ मध्ये कोसळलेल्या दरडीमुळे अनेकांचा जीव गेला. नैसर्गिक आपत्तीच्या काळात बचावकार्य जलद गतीने व्हावे यासाठी महाडमध्ये एनडीआरएफचे दल असावे ही भूमिका प्रशासनाने घेतली. त्यानुसार एनडीआरएफच्या २२ जवानांची एक तुकडी महाडमध्ये १५ जुलैपासून दाखल झाली आहे. दरडग्रस्तांना तसेच पूरग्रस्तांना आपत्तीच्या काळात मदत करण्याचे काम एनडीआरएफ जवान करणार आहेत. या जवानांसोबत बोट, दोरखंड, लाईफ जॅकेट, टॉर्च, खाण्यापिण्याचे साहित्य तसेच या पथकासमवेत एक श्वानदेखील असणार आहे. दरडीखाली सापडलेल्यांना श्वानच्या मदतीने शोधण्याचे काम प्रभावी होणार आहे. या पथकाबरोबर बचाव कार्यासाठी आवश्यक असलेली अत्यानुधिक साधने देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहेत