कोल्हापूर प्रतिनिधी
महापूरामध्ये मदत कार्य करणारे ‘एनडीआरएफ’चे एक पथक सोमवारी कोल्हापुरात दाखल झाले. या पथकाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांची भेट घेऊन चर्चा केली. या एका पथकात 21 जवान असून हे पथक कोल्हापुरात बचाव कार्य करणार आहे. त्यांच्याकडे तीन बोटी, तसेच लाइफ जॅकेट आणि लाईफ रिंग अशी साधन सामग्री आहे. हे पथक 17 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत जिह्यात कार्यरत राहणार आहे.
‘एनडीआरएफ’चे निरीक्षक जालिंदर फुंदे आणि पुरुषोत्तम सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक सोमवारी दाखल झाले. यानंतर जालिंदर फुंदे यांनी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते. यावेळी संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे यांनी फुंदे यांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या.









