वृत्तसंस्था/ बँकाक
येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. शुक्रवारी झालेल्या ड गटातील शेवटच्या सामन्यात बलाढ्या जपानने भारताचा 8-4 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला या सामन्यात विजयाची नितांत गरज होती. पण या पराभवामुळे भारतीय कनिष्ठ फुटबॉल संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
भारत आणि जपान यांच्यातील हा सामना एकतर्फीच झाला. प्रेमवीरला निलंबित केल्याने त्याच्या जागी मुकुल पनवारला मैदानात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. या सामन्यातील पहिल्या मिनिटापासूनच जपानने वेगवान आणि आक्रमक खेळाच्या जोरावर आपली पकड मजबूत केली. भारतीय संघातील टी. गंगटेकडून कांही आक्रमक चाली उपयोगी ठरल्या. जपानचे खाते केवामुराने उघडले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताला गोल करण्याची एकमेव संधी मिळाली होती. पण जपानच्या गोलरक्षकाने भक्कम गोलरक्षण करून भारताला खाते उघडण्यापासून रोखले. जपानच्या गेकु नेवाटाने दुसरा गोल केला. मध्यंतराला कांही सेकंद बाकी असताना नेवाटाने संघाचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत जपानने भारतावर 3-0 अशी आघाडी मिळविली होती. खेळाच्या उत्तरार्धातील पहिल्या दोन मिनिटात जपानने आणखी दोन गोल नोंदविले. दरम्यान मुकुल पनवारने भारताचे खाते उघडले. जपानच्या नेगानो आणि योशीनेगा यांनी जपानचे दोन गोल नोंदवून आपल्या संघाला 5-1 अशी आघाडी मिळवून दिली. भारताचा दुसरा गोल डॅनी मेताईने नोंदविला. गंगटेच्या पासवर मेताईने हा गोल केला.
भारताने यानंतर तिसरा गोल करून जपानची आघाडी थोडी कमी केली. गंगटेने क्रॉस फटक्यावर हा गोल नोंदविला. यानंतर जपानच्या नेकाजिमने आपल्या संघाचा सहावा गोल केला. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना लालपेकूला रालतेने भारताचा चौथा गोल नोंदविला. या सामन्यातील 8 मिनिटांच्या दुखापतीच्या कालावधीत जपानने आणखी दोन गोल केले. यामागुची आणि सुगीयारो यांनी प्रत्येकी 1 गोल करून भारताचे आव्हान 8-4 अशा गोलफरकाने संपुष्टात आणले. या विजयामुळे जपानला 3 गुण मिळाले. तर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.









