नितीश कुमार यांनी राज्याला केले जंगलराजमुक्त : अमित शहा यांचा विरोधकांवर जोरदार टीकाप्रहार
वृत्तसंस्था / सारण, पाटणा
बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपल्या विधानसभा निवडणूक प्रचाराला शानदार प्रारंभ केला आहे. आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर त्यांनी शनिवारी या राज्यातील सारण आणि पाटणा येथे सार्वजनिक सभांना संबोधित केले. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारला जंगलराजमुक्त केले असून त्यामुळे हे राज्य आज प्रगतीपथावर वेगाने धावत आहे, अशी भलावण त्यांनी केली. यंदा बिहारची जनता प्रगती आणि समृद्धी यांच्या पार्श्वभूमीवर चार दीपावल्या साजऱ्या करणार आहे, असे सूचक प्रतिपादन त्यांनी सभांमधून केले.
शनिवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांनी सारण जिल्ह्यातील तराईया येथील प्रचंड जाहीरसभेसमोर भाषण करुन केला आहे. तराईया मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार जनक सिंग यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येण्यापूर्वी अक्षरश: ‘जंगलराज’ होते. प्रौढांना या जंगलराजच्या आठवणींनी आजही त्रास होतो. युवकांनीही या आठवणींकडे दुर्लक्ष करु नये. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या जंगलराजपासून बिहारला मुक्त केले आहे. हे त्यांचे कार्य महान आहे. आज राष्ट्रीय लोकशाही आघाडी त्यांच्याच नेतृत्वात ही विधानसभा निवडणूक लढवित आहे. या संघर्षात आम्हीच विजयी होवू, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे ठाम प्रतिपादन अमित शहा यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांच्यामुळे प्रगती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाची आणि बिहारची खऱ्या अर्थाने प्रगती झाली आहे. त्यांच्याजवळ या देशासाठी आणि राज्यासाठी एक विकासाचा दृष्टीकोन आहे. सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी ते अथक परिश्रम करीत असतात. त्यांची 11 वर्षे ही देशातील गरीबांसाठी वरदान ठरली आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात नितीश कुमार ही जोडी बिहारसाठी लाभदायक ठरली आहे. याहीवेळी आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढत आहोत. त्यांनी बिहारसाठी खूप काही केले आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली.
विरोधकांमुळे दहशतवादाला बळ
काँग्रेस आणि तिचे मित्रपक्ष यांच्या बोटचेप्या धोरणांमुळे भारतात दहशतवाद फोफावला आहे. देशात काँग्रेस आणि बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या काळात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण खूपच मोठे होते. दहशतवाद्यांना मोकळे रान मिळाले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे हे आत्मघातकी धोरण सोडून, दहशतवाद्यांना भिडण्याचे नवे साहसी धोरण स्वीकारले. दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारल्याशिवाय ते वठणीवर येणार नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि आता ‘सिंदूर अभियान’ यांच्या माध्यमातून जेरीला आणले आहे. दहशतवाद्यांनी भारताची कळ काढल्यास आम्ही आता शांततेचा जप करीत स्वस्थ बसत नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देतो. हेच धोरण इतर सरकारांनीही आचरणात आणावयास हवे होते. प्रारंभापासून ते अवलंबिले असते, तर देशाची सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे झाली असती, अशा अर्थाचे प्रतिपादनही अमित शहा यांनी पाटणा येथे केले.
रालोआची जागावाटपात आघाडी
बिहारच्या विधानसभा निवडणुकीतील प्रथम टप्प्याचे मतदान 6 नोव्हेंबरला होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपले जागावाटप फारशा गोंधळाविना पूर्ण केले आहे. मात्र, विरोधी महागठबंधन अद्यापही जागावाटपासंबंधात चाचपडताना दिसत आहे. जागा वाटप होण्यापूर्वीच त्याच्यातील घटक पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केल्याने बराच गोंधळ निर्माण झाला आहे.
बिहारसाठी यंदा चार दिवाळ्या…
ड यंदा बिहार एकाचवेळी चार दिवाळ्या साजऱ्या करणार आहे. : अमित शहा
ड मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारच्या कायदा-सुव्यवस्थेत सुधार
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशासह बिहारचा झाला चहूमुखी लाभ
ड या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच विजय होणार









