पाटणा :
बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातेसंबंधी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकाराचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांनी येत्या उद्या गुरुवारी, अर्थात 4 सप्टेंबर या दिवशी ‘बिहार बंद’ आयोजित केला आहे. मंगळवारी यासंबंधात बिहारची राजधानी पाटणा येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ‘बिहार बंद’ची घोषणा करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातेविषयी असभ्य आणि अश्लाघ्य भाषेत काढलेल्या उद्गारांची शिक्षा बिहारची जनता विरोधी पक्षांना दिल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.









