केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य : द्रमुक नेत्यांकडे भ्रष्टाचाराची पदवी
वृत्तसंस्था/ कोइम्बतूर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. शाह यांनी बुधवारी कोइम्बतूर येथे भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यानंतर शाह यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. संबोधनाच्या प्रारंभी शाह यांनी राज्याच्या लोकांची माफी मागतो, मी जगातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक तमिळमध्ये बोलू शकत नाही असे म्हटले. यानंतर त्यांनी तामिळनाडूत घराणेशाहीच्या राजकारणाचा अंत होणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
2026 मध्ये तामिळनाडूत रालोआ द्रमुकचे सरकार सत्तेवरून हटविणार आहे. राज्यात पुढील विधानसभा निवडणुकीनंतर रालोआचे सरकार स्थापन होणार आहे. आम्ही राज्यातील घराणेशाही संपुष्टात आणणार आहोत. तामिळनाडूतील भ्रष्टाचार संपविला जाईल. तामिळनाडूतून भारतविरोधी कारवायांमध्ये सामील लोकांना हटविण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत असे उद्गार शाह यांनी काढले आहेत.
तामिळनाडूतून राष्ट्रविरोधी द्रमुकला हटविण्याची वेळ आली आहे. 2026 मध्ये तामिळनाडूत रालोआचे सरकार स्थापन होणार आहे. नवे सरकार येथे एका नव्या युगाची सुरुवात करेल. आम्ही घराणेशाहीचे राजकारण आणि भ्रष्टाचार संपविणार आहोत. राज्यातून राष्ट्रविरोधी कारवायांचे समूळ उच्चाटन करू असा दावा शाह यांनी केला आहे.
जनगणनेच्या आधारावर परिसीमन करण्यात आल्यास तामिळनाडूला 8 लोकसभा मतदारसंघांचे नुकसान होईल हा मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा दावा शाह यांनी फेटाळला आहे. तामिळनाडू एकही मतदारसंघ गमाविणार नसल्याचे म्हणत या प्रक्रियेच्या संभाव्य प्रभावावरील चिंता फेटाळल्या आहेत.
द्रमुकला केले लक्ष्य
भ्रष्टाचाराप्रकरणी द्रमुकच्या सर्व नेत्यांकडे मास्टर डिग्री आहे. त्यांचा एक नेता नोकरीसाठी पैसे घेतल्याप्रकरणी आरोपी आहे. दुसरा नेता मनी लॉन्ड्रिंग आणि अवैध वाळू उपसा करण्याच्या गुन्ह्यात सामील आहे. तिसऱ्या नेत्यावर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती मिळविल्याचा आरोप असल्याची टीका शाह यांनी केली आहे.
संपुआच्या तुलनेत अधिक निधी
राज्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरूनही अमित शाह यांनी स्टॅलिन सरकारला घेरले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री हे मोदी सरकारने राज्यासोबत अन्याय केल्याची ओरड नेहमी करत असतात. परंतु स्टॅलिन हे जर सत्य बोलणारे असतीलतर त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. 2004-2014 दरम्यान संपुआ सरकार होते आणि त्याने राज्याला अनुदान आणि हस्तांतरणाच्या स्वपरात 1,52,901 कोटी रुपये दिले होते. तर मोदी सरकारने मागील 10 वर्षांमध्ये 5,08,337 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याचबरोबर मोदी सरकारने पायाभूत सुविधा विकासांसाठी 1,43,000 कोटी रुपये तामिळनाडूला दिले असल्याचा युक्तिवाद शाह यांनी केला आहे.









