भाजप-संजदला प्रत्येकी 101 जागा : लोजपला 29 जागा लढविता येणार
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीकरता रालोआतील जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या दीर्घ बैठकीनंतर आघाडीत कुठला पक्ष किती जागा लढविणार याचे चित्र स्पष्ट झाले. भाजप आणि संजद प्रत्येकी 101 जागा लढविणार आहे. तर चिराग पासवान यांच्या लोजप (आर)च्या वाट्याला 29 जागा आल्या आहेत. उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएम आणि जीतनराम मांझी यांच्या हम पक्षाला प्रत्येकी 6 जागा मिळणार आहेत. रालोआच्या सहकाऱ्यांनी सौहार्दपूर्ण वातावरणात जागावाटप केल्याचे वक्तव्य बिहार भाजपचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.
रालोआतील जागावाटप पाहता यावेळी छोटा भाऊ-मोठा भाऊ असे काही नसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, कारण भाजप आणि संजद दोन्ही पक्ष समान 101 जागा लढविणार आहेत. परंतु याविषयीचा संकेत बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी यापूर्वीच दिला होता. यंदाच्या निवडणुकीत कुणी मोठा भाऊ-छोट्या भावाच्या भूमिकेत नसेल असे त्यांनी पाटण्यातील एका बैठकीनंतर सांगितले होते.
रालोआ परिवाराने सौहार्दपूर्ण वातावरणात बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप केल्याचे केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे. रालोआच्या सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते जागावाटपाच्या सूत्राचे स्वागत करत असून नितीश कुमारांना पुन्हा प्रचंड बहुमतासह मुख्यमंत्री करण्यासाठी संकल्पबद्ध आणि एकजूट आहेत असे वक्तव्य संजदचे कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा यांनी केले आहे.
रालोआच्या सर्व पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे हर्षपूर्वक स्वागत केले आहे. सर्व सहकाऱ्यांनी बिहारमध्ये पुन्हा रालोआ सरकार स्थापन करण्यासाठी कंबर कसली असल्याचे भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटले आहे. रालोआतील जागावाटपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप केल्यावर निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.
बिहारमधील रालोआचे जागावाटप
भाजप 101
संजद 101
लोजप (आर) 29
आरएलएम 06
हम 06









