चंद्रपूरम पौन्नूसामी राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत. केंद्रातील भाजप प्रणित आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असलेले राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार निश्चित केले होते, त्यावेळी पासूनच त्यांचा विजय हा निश्चित मानला जात होता. राधाकृष्णन यांचा विचार करता ते संघाचे लहानपणापासूनचे कार्यकर्ते आहेत. आज 68 वर्षांचे असलेले राधाकृष्णन यांनी तामिळनाडूतील कोईंबतूर या लोकसभा मतदारसंघातून दोनवेळी लोकसभेच्या निवडणुका जिंकलेल्या होत्या आणि त्या देखील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर. केंद्रात सत्ता असो वा नसो, राधाकृष्णन यांनी भाजपचा विचार आपल्या मनातून कधीही काढला नव्हता. तामिळनाडूमध्ये भाजपच्या विरोधात प्रखर वातावरण काही राजकीय पक्षांनी निर्माण केलेले आहे आणि या पार्श्वभूमीवर कोईंबतूरमधून दोनवेळा निवडणुका जिंकणे ही तशी सोपी गोष्ट नव्हती. अलीकडेच रिक्त झालेल्या पदावर राधाकृष्णन यांची ही निवड थोडी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते परंतु त्याचा केवढा लाभ भाजपला होईल हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे. लवकरच तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या उद्देशानेच भाजपने मूळ तामिळनाडूचे असलेले चंद्रपुरम पौन्नूसामी राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन तामिळनाडूच्या जनतेला आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तामिळनाडू भाजपचे पूर्वाध्यक्ष असलेले राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याअगोदर 18 फेब्रुवारी 2023 रोजी झारखंडच्या राज्यपालपदाची शपथ ग्रहण केली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये देखील राधाकृष्णन यांनी भाजपला नेहमीच साथ दिलेली होती आणि त्याचे फळ त्यांना आता प्राप्त झाले. एकंदरीत लोकसभा आणि राज्यसभा खासदार मिळून एकूण 767 जणांनी मतदान केले. 13 जणांनी मतदानावर बहिष्कार टाकला. अत्यंत छोटे पक्ष असलेल्यांनी काँग्रेसची साथ दिली नाही हा काँग्रेससाठी धक्का होता. राज्यसभेवर देखील भाजपची पकड आहे हे यातून सिद्ध होईल. एकूण 98.3 टक्के मतदान उपराष्ट्रपतीपदासाठी झाले. पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून राधाकृष्णन यांची जी निवड झाली, या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालेले आहे हे निश्चित. काँग्रेस प्रणित ‘इंडी’ आघाडीने यावर आता जरूर विचार करावा. 19 अतिरिक्त मते सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला प्राप्त झाली. ही मते नेमकी कुठून आली हे कालांतराने कळून येईल. परंतु सध्या तरी इंडी आघाडीसाठी हा एक धक्का आहे. 19 जणांनी भाजपच्या बाजूने मतदान केले आणि हे मतदान पूर्णत: गुपित असल्यामुळे या पाठीमागे नेमके कोण आहेत, हे कळायला मार्ग नाही. परंतु काँग्रेस आघाडीची मते फुटली हे निश्चित आहे. तास-दीड तासांमध्ये मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि लागलीच निकालही जारी करण्यात आला. आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे पुन्हा एकदा दोन्ही भाजपचेच बनले आहेत. वास्तविक राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांना पक्षीय राजकारण लागू असू नये. परंतु आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये सत्ताधारी पक्ष ज्या उमेदवाराला उभा करतो तो ही पदे प्राप्त करीत असतो. आता उपराष्ट्रपतीपदी पोचल्यानंतर सीपी राधाकृष्णन यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. विरोधकांची दोन्ही सभागृहांमध्ये मिळून केवळ 300 मते झाली. राज्यसभेमध्ये एकापेक्षा एक फार हुशार मंडळी असतात. त्यामुळे त्यांना कसे हाताळायचे याचे कसब राधाकृष्णन यांना असणे आवश्यक आहे. जरी ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असले तरी देखील त्यांना एक निपक्ष सभापती या नात्याने राज्यसभेत वावरावे लागणार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे आजही अनेकांच्या हृदयात आहेत. दरवर्षी त्यांच्याच नावाने 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन आपण साजरा करीत असतो. आता सीपी राधाकृष्णन यांच्यावर देखील फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यांना अगोदरच्या राष्ट्रपतींचा अनुभव आणि त्यांची कार्यपद्धती याचा बारकाईने विचार करावा लागेल. त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा विरोधी पक्ष देखील बाळगून राहील. आता उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झालेली असली तरी मतदानात नेमके कोणी विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान केले यावर रंगतदार चर्चा सुरू होईल. सत्ताधारी भाजपला ज्यांनी गुप्तपणे समर्थन केले त्यावर आता बरीच चर्चा होणार आहे. जेव्हा अशा पद्धतीचे गुप्त मतदान होत असते त्यावेळी सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण हे काही समजण्यास मार्ग नसतो. राज्यसभेच्या निवडणुकीच्यावेळी देखील असेच प्रकार अनेक ठिकाणी होत असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात आपल्या पक्षाच्या प्रतोदला दाखवून मतदान करतात. या निवडणुकीत 15 मते ही इन व्हॅलिड ठरतात, ही देखील फार गंभीर बाब आहे. सर्व खासदारांना त्यांच्या राजकीय पक्षांनी पूर्णत: प्रशिक्षण दिल्यानंतर देखील अशा पद्धतीची 15 मते ही चुकीची ठरतात, अवैध ठरतात हे देखील तेवढेच धक्कादायक आहे. तथापि दक्षिण भारतातील एक राजकीय नेता या देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवडला जातो हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. संघाची विचारसरणी असलेला हा नेता राजकारणातील अनेक अनुभव घेऊन आता या पदावर पोहचतो हे स्वागतार्ह आहे. सुशिक्षित व प्रतिष्ठितपदी असलेली माणसे चुकीच्या पद्धतीने मतदान करतात. त्यामुळेच 15 मते अवैध ठरतात ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आता सत्ताधारी पक्षाच्या मुकुटात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांची निवड झालेली आहे आणि त्यातून केंद्रातील एनडीए सरकार अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते. या निवडणुकीतील मतदानानंतर केंद्रातील सरकार कोसळणार असे भाकीत राहुल गांधी यांनी केले होते, परंतु हा खेळ त्यांच्यावरच उलटलेला आहे. देशाच्या एकंदरीत राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिरतेसाठी सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ती योग्य आहे, असे म्हणावे लागेल.
Previous Article‘बिट्रेयल’ चित्रपटात सनी लियोनी
Next Article जॅक ड्रेपरला दुखापत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








