सीगन चषक क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखान आयोजित सीगन चषक वरि÷ लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एन. डी. वॉरियर्स संघाने झेन स्पोर्ट्स संघाचा दोन गडय़ांनी तर बेळगाव ग्लॅडिएटर संघाने पॉवर प्लेअर्स संघाचा 147 धावांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. आदित्य कलपत्री, सद्दाम होसकोटी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात झेन स्पोर्ट्स संघाने 20 षटकात 9 बाद 123 धावा केल्या. अरबाजने 29, आयुबने 18 धावा केल्या. एन. डी. वॉरियर्सतर्फे आर्यन व्ही.ने 26 धावात 4 तर आदित्य कलपत्रीने 26 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एन. डी. वॉरियर्सने 19.5 षटकात 8 बाद 126 धावा करून सामना 2 गडय़ांनी जिंकला. आदित्य कलपत्रीने 35, इम्रान एस.ने 33, श्रेयसने 22 धावा केल्या. झेनतर्फे सर्फराज व आयुब यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात बेळगाव ग्लॅडिएटर्सने 20 षटकात 3 बाद 220 धावांचा डोंगर रचला. सद्दाम होसकोटीनी 2 षटकार 14 चौकारासह 100 धावा करून शतक झळकाविले. सौरभ वाकेने 57 तर अलीम माडिवालेने 27 धावा केल्या. पॉवर प्लेअर्स संघातर्फे हरिष व दीपक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पॉवर प्लेअर्स संघाचा डाव 14.4 षटकात 73 धावात आटोपला.
हरिषने 14 तर श्रीकांतने 13 धावा केल्या. ग्लॅडिएटर्सतर्फे सद्दाम होसकोटीने 4 धावात 3 व हुसेन गोकाकने 26 धावात 2 गडी बाद केले. सामन्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते सामनावीर आदित्य कलपत्री (वॉरियर्स), सद्दाम होसकोटी (ग्लॅडिएटर) तर इम्पॅक्ट खेळाडू आर. एन. उपाध्ये व सौरभ यांना चषक देवून गौरविण्यात आले.









