तामिळनाडूतील द्रमुक सरकारविरोधात अण्णाद्रमुक कार्यकर्त्यांची निदर्शने : अभिनेता विजयकडून सूचना
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे अण्णा विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थिनीच्या झालेल्या लैंगिक शोषणाप्रकरणी संताप वाढत आहे. वाढता विरोध पाहता राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) एक समिती स्थापन केली असून या समितीने सोमवारी स्वत:चा तपास सुरू केला आहे. तर याप्रकरणी राजकारणही तीव्र झाले आहे. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुकने सोमवारी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, परंतु पोलिसांनी याकरता परवानगी नाकारली. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण तामिळनाडूत निदर्शने केली आहेत. निदर्शने करणाऱ्या अण्णाद्रमुकच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लैंगिक शोषणाप्रकरणी पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे.
अण्णा विद्यापीठात घडलेल्या घटनेमुळे पूर्ण राज्य हादरून गेले आहे. तसेच राज्याचे राजकारण तापू लागले आहे. चेन्नईत एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करण्यात आले. विद्यार्थिनीने पोलिसांकडे स्वत:च तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी यावर कुठलीही कारवाई करणे टाळले होते. सोशल मीडियावर यासंबंधी आवाज उठू लागल्यावर पोलीस जागे झाले आणि त्यांनी एका आरोपीला अटक केली. 37 वर्षीय आरोपी विद्यापीठाच्या परिसरानजीकच बिर्याणी विकत होता.
सत्य समोर आणणार
महिला आयोगाने चेन्नईतील या घटनेची दखल घेत तपासासाठी 28 डिसेंबर रोजी दोन सदस्यीय सत्यशोधन समिती स्थापन केली. समितीकडे याप्रकरणी तपास करणे, घटनेमागील स्थितीचे विश्लेषण करणे आणि अधिकाऱ्यांकडून उचलण्यात आलेल्या पावलांचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याचबरोबर ही समिती प्रकरणाशी संबंधित अधिकारी, पीडिता, तिचा परिवार, मित्र आणि विविध स्वयंसेवी संस्थांसोबत चर्चा करत वस्तुस्थिती जाणून घेणार आहे. तसेच अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी उपाय सुचविणार आहे.
समितीचे सदस्य
दोन सदस्यीय समितीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य ममता कुमारी आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक निवृत्त आयपीएस प्रवीण दीक्षित सामील आहेत. पथकाने तपासासाठी विद्यापीठ परिसराचा दौरा केला आहे. याचबरोबर मद्रास उच्च न्यायालयाने याप्रकरणी एसआयटी स्थापन केली असून तिच्यामार्फत याप्रकरणी तपास केला जाणार आहे.
राज्यपालांना भेटला विजय
अण्णा विद्यापीठातील लैंगिक शोषणाप्रकरणी अभिनेता तसेच तमिलगा वैत्री कषगम पक्षाचा प्रमुख विजय दलपतिने सोमवारी राज्यपाल आर.एन. रवि यांची भेट घेतली आहे. विजय यांनी अण्णा विद्यापीठातील घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपीला पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कायद्यानुसार दोषीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आणि न्याय निश्चित करण्याचे आवाहन मी तामिळनाडू सरकारला करत आहे. संवेदनशील भागांमध्ये निर्भया फंडद्वारे स्मार्ट पोल्स लावण्यात यावेत, यात इमर्जन्सी बटन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि टेलिफोनची सुविधा असावी. सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती, महिला सुरक्षेला चालना देणाऱ्या मोबाइल अॅप्स लाँच करणे आणि इमर्जन्सी हॉटलाइन सुरू करण्याची सूचना विजय यांनी केली आहे.









