चिपळूण :
अखेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि उद्योजक प्रशांत यादव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. १९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असून बंदरे विकास मंत्री नीतेश राणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या यादव यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात पक्ष मजबूत स्थितीत उभारला. राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार शेखर निकम यांच्याबरोबर गेले असतानाही यादव यांनी नव्या उमेदीने पक्षाची बांधणी केली. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत आमदार निकम यांना जोरदार टक्कर दिली. मात्र अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला. प्रकल्पाच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात राहिल्यानंतर त्यांना त्यानंतर त्यांचे बंधू पालकमंत्री उदय सामंत यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला लागोपाठ भेटी दिल्याने यादव यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली. सामंत यांनीही आपण पक्षप्रवेशाचे निमंत्रण यादव यांना दिल्याचे सांगून या चर्चेला फोडणी दिली.
एकीकडे यादव यांच्या शिंदे शिवसेनेच्या चर्चा सुरू असतानाच अचानकपणे यात भाजप नेत्यांनी एन्ट्री मारली. अशातूनच गेल्या आठवड्यात मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, नीतेश राणे यांच्याबरोबर यादव यांची चर्चा होऊन पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र आजतागायत भाजप प्रवेशाबाबत यादव यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. अशातच आता गुरुवारी मंत्री नीतेश राणे हे यादव यांच्या पिंपळी येथील डेअरी प्रकल्पाला भेट देण्यासाठी येत आहेत. सकाळी ९ वा. त्यांनी तेथेच पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यावेळी यादव यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाची व मुंबईतील कार्यक्रमांची घोषणा केली जाणार असल्याचे वृत्त आहे.








