निवडणूक आयोग घेणार आढावा ः
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँगेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आला आहे. निवडणूक आयोग लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला प्राप्त राष्ट्रीय काँग्रेसच्या दर्जाचा आढावा घेणार आहे. निवडणूक आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधींचे म्हणणे मंगळवारी ऐकून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रामुख्याने महाराष्ट्रात प्रभाव असलेला पक्ष असून काही राज्यांमध्ये त्याचे काही लोकप्रतिनिधी आहेत.
राष्ट्रीय पक्ष ठरण्यासाठीच्या अटी
-तीन राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत 2 टक्के जागा जिंकणे.
-4 लोकसभा मतदारसंघांसह लोकसभा निवडणुकीत 6 टक्के मते मिळविणे.
-अन्यथा विधानसभा निवडणुकांमध्ये किमान 4 राज्यांमध्ये 6 टक्के मते.
-4 किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असणे.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेले..
1 भाजप
2 काँग्रेस
3 बसप
4 राष्ट्रवादी काँग्रेस
5 भाकप
6 माकप
7 तृणमूल काँग्रेस
8 नॅशनल पीपल्स पार्टी
‘आप’ला मिळणार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा
दिल्लीच्या राजकारणातून सुरुवात करणाऱया आम आदमी पक्षाला गुजरात निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे आता जवळपास निश्चित आहे. सद्यकाळात दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत या पक्षाला 6.8 टक्के मते मिळाली होती. तसेच दोन आमदार निवडून आले होते.
1999 मध्ये पक्षाची स्थापना
शरद पवार यांच्या नेतृत्वात 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा समोर करून शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला होता. पवार यांना त्यावेळी पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर या नेत्यांनी साथ दिली होती.









