ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पुणे लोकसभेची पोटनिवडणुक काँग्रेस लढवेल असं म्हटलं होतं. आता अजित पवार यांनी या जागेवर दावा केला आहे. पुण्याची सध्याची परिस्थिती पाहिली तर कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे, हे पाहिले पाहिजे, त्यांची मतं पाहिली पाहिजेत, असं म्हणतं त्यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवलं. त्यामुळे या जागेवरुन दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महाविकास आघाडीत आतापर्यंत पुणे मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला आहे. या मतदारसंघात त्यांचे उमेदवार अनेकदा निवडूनही आले आहे. 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेस विस्तार करू पाहत आहे. दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पुणे लोकसभेची पोटनिवडणुकीची काँग्रेस लढवेल, असे म्हटले आहे. त्याबाबत अजित पवार यांना मीडियाने प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवार यांनी या जागेवर दावा केला.
अजित पवार म्हणाले, बाळासाहेब थोरात म्हणतात काँग्रेस ही जागा लढवणार, उद्या मी म्हणेन राष्ट्रवादी ही जागा लढवणार. आम्ही दोघांनी म्हणून काय उपयोग आहे का? वरच्या स्तरावर चर्चा होईल. तिन्ही पक्षांचे नेते या संदर्भात निर्णय घेतील. काँग्रेसने कितीही काही म्हटले तरी आज पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. एखाद्या मतदारसंघात जागा निवडून येण्याची शक्यता कमी असेल आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची ताकद तिथं जास्त असेल तर ती जागा मित्र पक्षाला दिली गेली पाहिजे. दुसरकडे जरी अशीच उलट परिस्थिती असेल. तेव्हाही असंच घडलं पाहिजे. जागांची अदलाबदलही करायला हवी, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.