जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मलगुंडे यांच्या उमेदवारीची घोषणा
इस्लामपूर : उरुण-इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी येथील राष्ट्रवादी भवनमध्ये त्यांची उमेदवारी घोषित केली. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने ही घोषणा झाल्याने नगरपालिका निवडणूक पक्ष चिन्हावर लढवण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
मलगुंडे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व घोषणांच्या निनादात त्यांच्या उमेदवारीचे जोरदार स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लोकनेते राजारामबापू पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा व प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
आमदार पाटील म्हणाले, आनंदराव मलगुंडे हे अजात शत्रू मितभाषी आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना नगरपालिकेतील कामाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या वडिलांनी स्व. बापूंना मोठी साथ दिली आहे. आपल्या पक्षाने १९८५ साली ३१ पैकी २९ जागा जिंकून नगरपालिकेची सत्ता मिळविली होती. त्यानंतर आपण ३१ वर्षे या शहराच्या विकासाला मोठी चालना दिली. यामध्ये मलगुंडे यांचा बाटा मोठा आहे. येत्या ४-६ दिवसात निवडणुका जाहीर होतील, कामाला लागा. गेल्या ९ वर्षात या शहरात काय विकास झाला, चालू होती, ती कामे बंद कशी पडली, हे सांगा, जनता निश्चित साथ देईल, असा विश्वास व्यक्त केला.
शहाजी पाटील म्हणाले, पक्षाचे राज्य सरचिटणीस यांच्या उमेदवारीस मान्यता दिली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज पश्न कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी अर्ज चार दिवसात भरून द्यावेत आनंदराव मलगुंडे यांनी उमेदवारीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत . नेते व संघटनेचा विश्वास सार्थ करू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रा.शामराव पाटील, खंडेराव जाधव, पै.भगवान पाटील, सुरेंद्र पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, दादासाहेब पाटील, अरुणादेवी पाटील, अॅड. धैर्यशिल पाटील, संदीप पाटील, पिरअली पुणेकर, अरुण कांबळे, शंकरराव चव्हाण, रोझा किणीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, संजय पाटील, संग्राम जाधव, दिग्विजय पाटील, सचिन कोळी, स्वरूप मोरे यांच्यासह जेष्ठ, युवक, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
घटक पक्ष बरोबर घेण्याचा प्रयत्न
आमदार पाटील म्हणाले, मलगुंडे हे चांगल्या प्रतिमेचे आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे. पक्ष सरचिटणीसांनी त्यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. ही निवडणूक पक्ष चिन्हावरच लढवण्यात येईल. घटक पक्ष काँग्रेस व शिवसेना उबाठा बरोबर आल्यास त्यांनाही घेवू घटक पक्ष नेत्यांशी शहराध्यक्ष चर्चा करतील. महायुतीतील भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक कमळ चिन्हावर लढण्यास काय हरकत आहे, अशी कोपरखळी त्यांनी मारली.








