जे गेले त्यांची काळजी नाही…त्यांच्या भविष्याची चिंता असल्याचे सांगून आता आपण पुन्हा पक्ष बांधणीसाठी बाहेर पडणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच या सर्व घडामोडींचे श्रेय देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाणार असून ऱाष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टींवर केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपने त्याच आमदारांना सत्तेत सामिल करून घेऊन या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे सिद्ध केले असल्याचे ते म्हणाले. तसेच महाविकास आघाडी ही कायम असून आम्हाला कोणतीही न्यायालयीन लढाई लढायची नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आज अजित पवार यांनी आज काही आमदारांना घेऊन शिंदे- भाजप सरकार बरोबर सत्तेत सामिल झाल्यावर शपथविधी झाला. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका मांडली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जे म्हणाले मी वरिष्ठांशी चर्चा करूनच निर्णय़ घेतला असे म्हणणाऱ्यांचे वरिष्ठ वेगळे आहेत. मी काही वरिष्ठ सहकाऱ्यांची बैठक बोलावलेली होती त्यावेळीच काही आमदारांनी वेगळी भुमिका घेतली होती. पण तिकडे गेलेले सर्व आमदार आपल्या संपर्कात आहे. येत्या दोन- तीन दिवसात याचे चित्र स्पष्ट होईल.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “असा प्रकार इतरांना नविन असेल मला नाही. यापुर्वीही मी केवळ पाच आमदारांबरोबर पक्ष बांधला आहे. मी पुन्हा पक्ष बांधीन. महाराष्ट्राच्या जनतेवर आणि तरूण पिढीवर माझा प्रचंड विश्वास आहे. अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर माझे काहीही म्हणणं नाही. माझा लोकांपर विश्वास मी पुन्हा लोकांमध्ये जाणार आहे. उद्या मी घराबाहेर पडणार असून कराडला जाऊन य़शवंतराव चव्हाणांच्या समाधिचे दर्शन घेणार आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्त्यांवर माझा प्रचंड विश्वास आहे. या घडामोडींमळे त्यांची होणारी अस्वस्थता मी समजू शकतो. आपल्य़ाला पक्ष पुन्हा बांधायचा आहे. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी सुनिल तटकरे आणि प्रप्फुल्ल पटेल यांची नेमणूक केली आहे. पण त्यांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही. शपथविधी अगोदर भुजबळ भेटून गेले आणि काय झालं ते कळवतो असे म्हणाले. या आमदारांवरील कारवाईबाबत पक्षाच्या इतर नेत्यांशी चर्चा करणार आहे.”








