देशात भाजपला अनुकुल परिस्थिती नसून पंतप्रधानांनी लाल किल्यावरून ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला आहे. त्यांच्या या घोषणेने त्यांची परिस्थिती देवेद्र फडणवीस यांच्या सारखी होते का ते निवडणूकीनंतर पाहूया असा मिष्किल टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवार यांनी घेतला आहे. सध्या ते मराठवाडा दौऱ्यावर असून औरंगाबाद येथून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
औरंगाबाद येथिल पत्रकार परिषदे बोलताना पत्रकरांनी काँग्रेस- ठाकरे गट वेगळी तयारी करणार आहेत का प्रश्नावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “काँग्रेस-ठाकरे गट वेगळी तयारी करायला लागल्याची फक्त चर्चा आहे पण वस्तुस्थिती नाही.”, असं शरद पवार म्हणाले.
भाजपवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, “देशात भाजपला अनुकुल वातावरण नाही. भाजप कडून यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालामध्येही हस्तक्षेप झाला. आयोगात ठाकरेंसोबत जे झालं ते आपल्याबरोबर होऊ नये म्हणून आम्ही आयोगाकडे गेलो नाही.” असेही ते म्हणाले.
पुण्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमावर बोलताना ते म्हणाले, “तो कार्यक्रम सहा महिन्यांपूर्वीच ठरला होता. लोकमान्य टिळक स्मारकाच्या विश्वस्तांमध्ये कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश आहे. कार्यक्रमाचे नियोजन करणारे गृहस्थ मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्याबद्दल चर्चा होत नाही. पण माझ्याबाबत चर्चा झाली.” असा खुलासा शरद पवार यांनी केला.








