ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नगरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर सात ते आठ जणांनी धारधार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात चत्तर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री साडेदहाच्या सुमारास सावेडी उपनगरातील एकविरा चौकात ही घटना घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरच्या सावेडी उपनगरातील एकविरा चौकात रात्री साडेदहाच्या सुमारास भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह सात ते आठ जणांनी अंकुश चत्तर यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चत्तर यांना स्थानिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात चत्तर यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागचे कारण अद्याप समोर आले नसून, आरोपींवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.









