चिपळुणात काॅंग्रेसच्या बैठकीत अनुकूलता, लवकरच चर्चा करण्याचा निर्णय
प्रतिनिधी/चिपळूण
एकीकडे स्थानिक राष्ट्रवादी येथील नगर परिषद निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी उत्सुक असताना स्वबळाचा नारा देत कॉंग्रेस दूर जात होती. मात्र गुरूवारी झालेल्या तालुका व शहर काॅंग्रेसच्या बैठकीत आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शवली. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसशी लवकरच चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या निर्देशांप्रमाणे नगरपालिका क्षेत्रासह गट व गणनिहाय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात पदयात्रा नियोजनाबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी संगीता लोटे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचेही स्वागत करण्यात आले. या बैठकीत आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडाबाबत चर्चा करण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी अनुकुलता दर्शवली. तसा संदेश बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला कळवण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष लियाकत शाह यांनी पत्रकारांना दिली.
हे ही वाचा : नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती; निवडणूक आयोगाचा निर्णय
या बैठकीला काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक सुधीर शिंदे, माजी नगरसेवक कबीर काद्री, माजी नगरसेवक करामत मिठागरी, सफा गोठे, जीवन रेळेकर, वासुदेव सुतार, सुरेश राऊत, गुलजार कुरवले, यशवंत फके, अश्विनी भुस्कुटे, शमून घारे, अन्वर जबले, युवक काँग्रेसचे क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले यांच्यासह पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते.