जळगाव / प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक होऊ घातली असून, या निवडणुकीत शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सहकार पॅनेल तयार करण्यात आले आहे. या पॅनेलच्या जाहिराती झळकत असून या जाहिरातींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांचे फोटो झळकत असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपात येणार काय, याबाबत राज्यभर चर्चा सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. धरणगाव हे गुलाबराव पाटील यांचे गाव. त्यांचा मतदारसंघ आणि या मतदारसंघात होत असलेल्या या निवडणुकीत शिंदे गट भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या जाहिरात पत्रकांवर शेतकऱ्यांसाठी आपण काम करत असल्याचे नमूद करत या पत्रकात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि अजित पवार तसेच गुलाबराव पाटील यांचे फोटो टाकण्यात आलेले असल्याने याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे.
सध्या अजित पवार हे भाजपात येणार काय याबाबत चर्चा होत असताना अजित पवार यांनी नकार दर्शवला असला तरी जळगाव जिल्ह्यात अशा पद्धतीने राष्ट्रवादीने भाजपासोबत जाणे हे काहींना रुचलेले नाही. त्यामुळे यावर जोरदार चर्चा सुरू आहे. गुलाबराव पाटील हे मात्र अजित पवार भाजपात येतील, याबद्दल ठाम विश्वास बाळगून आहेत. सध्या मुहूर्त नसल्याने ते येत नसल्याचे सांगितले जात आहे.








