सावंतवाडी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबरच राहणार आहेत . जिल्ह्यातील शंभर टक्के कार्यकर्ते पवारांसोबत राहतील असा मला विश्वास असून यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्याशी मी संपर्क साधून आहे. या सर्वांनी आम्ही शरद पवार यांच्यासोबत असल्याचे ठामपणे सांगितले आहे. शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्पष्ट केले आहे . रविवारी राज्यात घडलेल्या घडामोडीत विरोधी पक्ष नेते असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना- भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर संपूर्ण राज्यात आणि देशात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगून शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगितले आहे. सिंधुदुर्गातील शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी पवारांसोबत राहतील यासंदर्भात कार्यकर्ते नेते पदाधिकारी यांच्याशी बोलणी चालू असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे . मात्र , अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत सामंत यानी कोणतेही भाष्य केलेले नाही.









