वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पुढच्या शैक्षणिक वर्षापासून एसीईआरटीची काही इयत्तांची पाठ्यापुस्तके स्वस्त होणार आहेत, अशी माहिती मंगळवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. पुढील शिक्षण वर्षात 15 कोटी पाठ्यापुस्तके मुद्रित केली जाणार असून त्यांची गुणवत्ता उच्च असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
सध्या या संस्थेकडून 5 कोटी पाठ्यापुस्तकांचे प्रकाशन केले जाते. अलिकडच्या काळात शाळांमध्ये या संस्थेने प्रकाशित केलेल्या पाठ्यापुस्तकांचा उपयोग केला जातो. त्यामुळे पुस्तकांना मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी मागणी आणि पुरवठा यांच्यात अंतर राहिल्याने अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. यापुढे ही समस्या येऊ नये, याची दक्षता घेण्यात येत असून पुरेशा प्रमाणात दर्जेदार पाठ्यापुस्तके मुद्रित केली जातील, असे आश्वासन प्रधान यांनी दिले आहे.
किमती कमी होणार
एनसीईआरटीच्या पुस्तकांची गुणवत्ता सुधारण्यासमवेतच काही इयत्तांच्या पाठ्यापुस्तकांची किमती कमी करण्यावर विचार केला जात आहे. लवकरच यासंबंधात निर्णय घेतला जाणार असून पुस्तकांची किंमत कमी केली जाणार आहे. यामुळे निम्नउत्पन्न गटातील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. यापुढे प्रतिवर्षी 15 कोटी पाठ्यापुस्तकांचे मुद्रण केले जाणार असून मुद्रणक्षमता वाढविण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आली आहे, अशी माहितीही प्रधान यांनी दिली.
नव्या अभ्यासक्रमाप्रमाणे पुस्तके
2026-2027 च्या शैक्षणिक वर्षात नव्या आणि अद्ययावत अभ्यासक्रमाची पुस्तके संस्थेकडून उपलब्ध केली जातील. कालमानुसार शिक्षणक्रमात योग्य ते परिवर्तन करण्यात आले आहे. भारतीय मूल्यांच्या शिक्षणावर भर देण्यात आला आहे. पुस्तकांचा मुद्रणाचा खर्च वाढला असला, तरी विद्यार्थ्यांना ती वाजवी दरात उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर अधिक बोजा पडणार नाही, अशी दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
अभ्यासक्रम अद्ययावत होणार
कालमान, नवी संशोधने आणि नवी परिवर्तने लक्षात घेऊन पुढील वर्षापासून अभ्यासक्रमात परिवर्तन करण्यात येत आहे. कोणत्या प्रकारे हे परिवर्तन करावे, तसेच अभ्यासक्रमात कोणत्या नव्या बाबींचा समावेश करावा, किंवा कोणत्या जुन्या बाबी वगळाव्यात यावर एनसीईआरटीच्या बैठकांमध्ये सविस्तर विचार होत आहे. मूल्याधारित आणि सकस अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे. नव्या ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम तत्वां’च्या अनुसार अभ्यासक्रमात परिवर्तन केले जात आहे. इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या कक्षांची अद्ययावत अभ्यासक्रमाची पाठ्यापुस्तके 2026-2027 च्या अभ्याक्रमासाठी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.









