ऑनलाईन टीम / मुंबई :
आर्यन खान प्रकरणात रोज नवनवे धागेदोरे समोर येत आहेत. रविवारी या प्रकरणातील पंचनाम्यावर स्वाक्षरी करणारा पंच प्रभाकर साईल याने एनसीबीचे डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सुरुवातीपासूनच या प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळीच ट्विट करुन एनसीबी ‘स्पेशल 26’ बाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे म्हटले आहे.
कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात शाब्दिक लढाई सुरू आहे. मलिक यांनी भ्रष्टाचारासह वानखेडेंच्या वैयक्तिक जीवनावरूनही त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी काल केला होता. त्यांचा धर्म मुस्लिम आहे. त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी सोमवारी केला होता. तसेच, ट्विटरवर समीर वानखेडे यांच्या जन्म दाखलाच पोस्ट केला होता. त्यावर वानखेडे यांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
त्यानंतर आज सकाळीच मलिक यांनी दोन ट्विट केले. त्यामध्ये म्हटले आहे की, एनसीबीच्या अधिकाऱ्याने पाठवलेले एक निनावी पत्र मला प्राप्त झाले आहे. एनसीबीमधील स्पेशल-26 बाबत मी लवकरच ट्विटच्या माध्यमातून उगलडा करणार आहे.








