ममता बॅनर्जी यांचा दावा
► वृत्तसंस्था / कोलकाता
सहस्रावधी वर्षांपासून भारताच्या संस्कृतीचा आणि हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असलेला ‘महाभारत’ हा ग्रंथ महर्षि व्यासांनी लिहिला नसून तो काझी नझरुल इस्लाम यांनी लिहिला आहे, असा खळबळजनक दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथील एका कार्यक्रमात केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका आणि उपहास यांचा वर्षाव होत आहे. मुस्लीम मतांसाठी त्या अशी धादांत खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने करीत आहेत असा आरोप केला जात आहे.
‘राकेश रोशन’ चंद्रावर पोहचला होता, इंदिरा गांधी चंद्रावर पोहचल्या होत्या, अशी हास्यास्पद विधाने त्यांनी नुकतीच केली आहेत. नेटकरी सोशल मीडियावर त्यांचा यथोचित समाचार घेत आहेत. तथापि, महाभारताचे लेखक नझरुल इस्लाम आहेत, असे म्हणून त्यांनी कळस गाठला आहे. याच कार्यक्रमात त्यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्यावर उपस्थितांना त्यांचे नेहमीचे प्रवचन ऐकवले. पण महाभारतासंबंधी वादग्रस्त विधान करुन त्यांनी हिंदू-मुस्लीम वादाची ठिगणी नव्याने स्वत:च टाकली, अशी कठोर टीका आता त्यांच्यावर सोशल मीडियामधून होत आहे.
मतपेटीचे राजकारण
इस्रोचे चांद्रयान-3 हे अभियान यशस्वी झाल्यापासून ममता बॅनर्जींचा तोल सुटला आहे आणि त्या मनाला येईल ती विधाने करीत आहेत. हे अभियान यशस्वी झाल्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळेल अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे त्यांनी वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटाच लावलेला आहे, अशी टीका केली जात आहे. त्यांचे महाभारतासंबंधीचे विधान मतपेटीच्या राजकारणाचा भाग आहे. पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांना खूष ठेवण्यासाठी त्या हिंदू धर्मग्रंथांचा आणि हिंदूंच्या इतिहासाचा अवमान करण्याचे दु:साहस करीत आहेत, अशीही टीका त्यांच्यावर केली जात आहे. मात्र, अशा विधानांमुळे त्यांचा राजकीय लाभ होण्याऐवजी तोटाच होईल. त्यांनी स्वत:च्या जीभेला आवर घालावा, असा इशाराही त्यांना देण्यात येत आहे.









