छत्तीसगड सीमेवरील दुर्घटना ः जीवितहानी टळली
रायपूर / वृत्तसंस्था
छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. येथे नक्षलवाद्यांनी प्रवाशांच्या उपस्थितीत बस पेटवून दिल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. याचदरम्यान जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळू लागले. या धावपळीत 2 महिला जखमी झाल्या आहेत. बहुतांश जणांनी बसमधून उडी मारून आपला जीव वाचवल्याने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. केवळ 5 नक्षलवाद्यांनी ही घटना घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य नक्षलवादी जंगलात लपून बसले होते. या घटनेनंतर या भागात अतिरिक्त फौजफाटा रवाना करण्यात आला. सोमवारी दिवसभर येथे शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र, नक्षलवाद्यांनी जंगलभागात आश्रय घेतल्याने त्यांचा काहीच मागमूस लागू शकला नाही.
दंतेवाडा, विजापूर, सुकमा भागातील सोमवारच्या स्वयंघोषित बंददरम्यान नक्षलवाद्यांनी भ्याड कृत्य केले. रविवारी रात्री नक्षलवाद्यांनी बस पेटवून दिली असून ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नक्षलवादी रात्री उशिरा छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवरील सुकमा जिह्यातील कोंटापासून 15 किमी अंतरावर असलेल्या सिरवल्ला गावापर्यंत पोहोचले होते. यानंतर त्यांनी ओडिशाहून हैदराबादला जाणारी बस थांबवली. बस थांबवल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. त्याचवेळी लोकांनी नक्षलवाद्यांचे म्हणणे न ऐकल्याने प्रवासी आत असताना त्यांनी बस पेटवून दिली. यादरम्यान बससह अनेक प्रवाशांचे सामान आतच राहून जळून खाक झाले. घटनास्थळी गोंधळ उडाला. लोकांना काय करायचे ते समजत नव्हते. नंतर कसा तरी तो बसमधून बाहेर पडला. त्यामुळे 2 महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. बऱयाच जणांनी बसमधून खाली उडय़ा मारत स्वतःचा जीव वाचविला.









