ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा परिसरात धमकीचे पत्र टाकले असून, त्यात धर्मरावबाबा, त्यांचे जावई आणि काही लोकांना धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
मागील दोन वर्षांपासून सूरजागड येथे लोह खाणीत खनिजांचे उत्खनन सुरू आहे. त्याला नक्षल्यांचा विरोध आहे. यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशा प्रकारची धमकी देणारे पत्र गट्टा परिसरात आढळून आले. हे पत्रक पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास यांच्या नावे असून, यात आत्राम यांचे जावई, त्यांचे भाऊ व कंपनीत कार्यरत काही लोकांची देखील नावे आहेत.
अत्राम यांना वर्षभरात नक्षलवाद्यांनी तिसऱ्यांदा धमकी दिली आहे. यापूर्वी सूरजागड येथे सुरू असलेल्या लोह प्रकल्पावरून हिवाळी अधिवेशनात आणि त्यानंतर एकदा धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती.








