स्फोटकांचा घातपातासाठी वापर होण्याची भीती : ओडिशाच्या राउरकेलामध्ये मोठी घटना
वृत्तसंस्था/ राउरकेला
ओडिशाच्या राउरकेलामध्ये नक्षलींनी पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेला आव्हान दिले आहे. नक्षलवाद्यांनी स्फोटकांनी भरलेला ट्रकच लुटला आहे. नक्षलवाद्यांनी दीड टन स्फोटकांनी भरलेला ट्रक लुटला असून या घटनेनंतर झारखंड आणि ओडिशा पोलीस अलर्टवर आहेत. तर या स्फोटक सामग्रीचा वापर नक्षलवादी घातपातासाठी करू शकतात अशी भीती व्यक्त होत आहे.
हा ट्रक राउरकेलाच्या केबलांग येथून बांको दगडखाणीच्या दिशेने जात होता. नक्षलवाद्यांनी ट्रक रोखून त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आणि ट्रक शस्त्रास्त्रांचा धाक दाखवत जंगलाच्या दिशेने नेला. ही घटना उघडकीस आल्यावर झारखंड आणि ओडिशा पोलीस पूर्णपणे सतर्क झाले आहेत.
नक्षलवाद्यांनी चालकाला काही तासांनी मुक्त केले तसेच ट्रक दिसून आला, परंतु विस्फोटकांचा शोध लागलेला नाही. प्रकरणाचे गांभीर्य पाहता सारंडा वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. परंतु या भागाची संवेदनशीलता आणि घनदाट जंगलामुळे सुरक्षा दलांना शोधमोहिमेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर चालकाला ताब्यात घेत अधिक चौकशी करण्यात येत आहे. नक्षलवादी म्होरक्या मिसिर बेसरा हा सारंडा क्षेत्रात असल्याने त्याच्या नेतृत्वातच नक्षलवाद्यांनी हे कृत्य केल्याची शक्यता आहे.
तर या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षाव्यवस्थेला प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुमारे 15 वर्षांपूर्वी देखील याच क्षेत्रात नक्षलवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाला लुटले होते. 18 जुलै 2009 रोजी राउरकेला येथील चंपाझरण जंगलात नक्षलवाद्यांनी वाहनातील विस्फोटके पळविली होती.
नक्षलवादाची समस्या छत्तीसगड, झारखंडमध्ये तुलनेत अधिक असून ओडिशा, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ती दिसून येते. अलिकडच्या काळात सुरक्षा दलांनी नक्षलवादाच्या विरोधात अनेक यशस्वी मोहिमा राबविल्या असून अनेक मोठे नक्षली म्होरके मारले गेले आहेत. तर अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे.









