केंद्र सरकारकडे युद्धबंदीची मागणी : अमित शाह यांच्या छत्तीसगड भेटीपूर्वी पाठविले पत्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, रायपूर
छत्तीसगडमधील सुरक्षा दलांच्या सततच्या कारवाईनंतर नक्षलवाद्यांनी आता युद्धबंदीची मागणी केली आहे. जर सरकारने कारवाई थांबवण्याची घोषणा केली तर नक्षलवादी सरकारशी बोलण्यास तयार आहेत, असे पत्रात म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा दलांच्या तुकड्या सतत कारवाया करत असल्यामुळे नक्षलवादी संघटना हादरल्या आहेत. याचदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नक्षलग्रस्त बस्तर दौऱ्यापूर्वी, नक्षलवाद्यांनी तात्काळ युद्धबंदी आणि सशर्त शांतता चर्चेची मागणी केली आहे.
नक्षलवादी गटाचे प्रवक्ते अभय यांनी जारी केलेल्या निवेदनात, केंद्र सरकारला नक्षलविरोधी कारवाई थांबवण्याची विनंती करण्यात आली आहे. यासोबतच सुरक्षा दलांना मागे घेण्याची आणि नक्षलविरोधी कारवाया थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह 4 एप्रिल रोजी संध्याकाळी रायपूरला पोहोचतील. दुसऱ्या दिवशी, 5 एप्रिल रोजी गृहमंत्री नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. या भेटीत ते पांडुम महोत्सवाच्या समारोप समारंभात सहभागी होतील. येथे त्यांना माँ दंतेश्वरीचे दर्शन मिळेल. याशिवाय, ते नक्षलविरोधी मोहिमेतील ऑपरेशन कमांडर्सशीही संवाद साधणार आहेत.
छत्तीसगड तसेच शेजारील राज्यांमध्ये नक्षलवाद्यांना ठेचण्याचा प्रयत्न सरकारकडून सातत्याने केला जात आहे. याचदरम्यान ते शांतता चर्चेसाठी सज्ज झाले आहेत. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर, नक्षलवाद्यांच्या प्रवक्त्याने एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकामध्ये 15 महिन्यांत आमचे 400 साथीदार मारले गेले आहेत. जर केंद्र आणि राज्य सरकारने हे काम थांबवले तर आपण सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहोत, असे नमूद करण्यात आले आहे.
सुरक्षा दलांनी बस्तर रेंजमध्ये चालू वर्षात आतापर्यंत 119 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. शनिवारच्या चकमकीत 17 जणांचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी छत्तीसगडमध्ये 50 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करत मुख्य प्रवाहात येण्याची तयारी दर्शवली होती. सरकारच्या नक्षलविरोधी मोहिमेला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.









