बीएसएफची कारवाई : शस्त्रs बनवण्याच्या मशीनची बॅटरी, गॅस सिलिंडर जप्त
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमधील नारायणपूर जिह्यातील जंगलात गस्तीवर असलेल्या बीएसएफच्या पथकाने नक्षलवाद्यांकडील मशिनरी आणि अन्य साहित्य शनिवारी जप्त केले. गस्तीदरम्यान सुरक्षा जवानांना एलपीजी सिलिंडर, वेल्डिंग गॅस सिलिंडर, फोल्डेबल खुर्च्या, डिटोनेटर, नक्षलवादी गणवेश, पिट्टू बँग, सोलर प्लेट्स, शस्त्रs बनवण्याची मशीन, मोठे बॉक्स, तेलाचे टिन्स, साबण आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य सापडले. जप्त केलेले नक्षली साहित्य सुरक्षा दलांनी घटनास्थळीच नष्ट करण्याची कारवाई केली. नारायणपूर डीआरजी आणि बीएसएफच्या पथकाकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली.
नारायणपूर जिल्ह्यातील वाला-पांगूर गावाच्या जंगलात गस्तीदरम्यान सुरक्षा दलांना नक्षलींकडील बरेच साहित्य सापडल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिली. अशा प्रकाराचे नक्षलवादी साहित्य नारायणपूर पोलिसांना कधीच मिळाले नव्हते. असे साहित्य सापडणे पोलिसांसाठी अतिशय आश्चर्यकारक होते. या साहित्यामुळे सदर परिसरात नक्षलवादी आश्रय घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नक्षलवाद्यांकडील साहित्य जप्त करण्यात आले असले तरी घटनास्थळी एकही नक्षलवादी सापडला नाही.









