वापसीवेळी करू भव्य स्वागत : शाहबाज शरीफ
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानात पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ 21 ऑक्टोबर रोजी मायदेशी परतणार आहेत. यासंबंधीची माहिती माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली आहे. नवाज हे मायदेशी परतल्यावर भव्य स्वागत केले जाणार आहे. यानंतर तेच निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. पीएमएल-एनच्या लंडन येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे शाहबाज यांनी सांगितले आहे.
पाकिस्तान अण्वस्त्र मिळवून देणे आणि चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाचे पूर्ण श्रेय नवाज यांना जाते. तसेच देशात 20 तासांचे भारनियमन संपुष्टात आणण्यामागे देखील त्यांचेच योगदान आहे. पाकिस्तानला आण्विक शक्ती न करण्यासाठी नवाज यांना 5 अब्ज डॉलर्सची ऑफर मिळाली होती, परंतु त्यांनी पाकिस्तानचे हित सर्वोपरि मानले होते असा दावा शाहबाज यांनी केला आहे.
पाकिस्तानात 2013-18 दरम्यान राहिलेला विकासाचा वेग 2018 च्या निवडणुकीनंतर रखडला नसता तर देश आज विकासाच्या पथावर अग्रेसर असता. नवाज शरीफ हे परतल्यावर पाकिस्तानात पुन्हा विकासाचे पर्व सुरू होणार आहे. नवाज यांना एका खोट्या गुन्ह्याच्या आधारावर सत्तेवरून हटविण्यात आले होते. तसेच पूर्ण देशाचा विकास अन् प्रगती रोखण्यात आली होती असे शाहबाज यांनी म्हटले आहे.
संसदेत बदलला कायदा
3 महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शाहबाज शरीफ यांच्या सरकारने संसदेत ‘लाइफटाइम डिस्क्वॉलिफिकेशन’ (आजीवन अपात्र) रद्द केले होते. नव्या कायद्याच्या अंतर्गत कुठल्याही खासदाराला आता 5 वर्षांपेक्षा अधिक काळासाठी अपात्र ठरविले जाऊ शकत नाही. या निर्णयाचा लाभ थेट स्वरुपात नवाज यांना मिळणार आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये नवाज शरीफ यांना पनामा पेपर्स प्रकरणी अपात्र घोषित केले होते. यामुळे त्यांना कुठल्याही राजकीय पक्षात सामील होण्यापासून रोखण्यात आले होते. 2019 मध्ये लाहोर उच्च न्यायालयाने नवाज यांना उपचारासाठी विदेश जाण्याची अनुमती दिली होती. तेव्हापासून नवाज हे लंडनमध्ये वास्तव्य करून आहेत.
भ्रष्टाचारप्रकरणी शिक्षा
न्यायालयाने 2018 मध्ये नवाज यांना अल-अजीजिया स्टील मिल्स भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवत 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर एवनफील्ड प्रॉपर्टी प्रकरणी 11 वर्षांची शिक्षा तसेच 80 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.









