लंडनहून अबुधाबीमार्गे लाहोरमध्ये दाखल होणार : 4 वर्षांनी मायदेशी होणार आगमन
वृत्तसंस्था/ लंडन
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे 21 ऑक्टोबर रोजी 4 वर्षांनी लंडनहून मायदेशी परतणार आहेत. याकरता त्यांनी फ्लाइटचे तिकीटही बुक केले आहे. नवाज हे प्रथम लंडनहून अबुधाबी येथे पोहोचणार आहेत, यानंतर ते लाहोरमध्ये दाखल होणार आहेत.
नवाज हे 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी लाहोरच्या विमानतळावर दाखल होतील. नवाज शरीफ यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक, वैयक्तिक सल्लागार डॉ. एदनान तसेच खासदार इरफान सिद्दीकी प्रवास करणार आहेत. नवाज यांचा पक्ष पीएमएल-एनचे नेते त्यांच्या स्वागतासाठी अबुधाबी विमानतळावर जाणार आहेत. याचबरोबर लाहोरमध्ये देखील नवाज यांच्या विशेष स्वागताची तयारी केली जात आहे. नवाज हे आता पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यशाली होऊन पाकिस्तानात परततील असे वक्तव्य त्यांच्या कन्या मरियम यांनी केले आहे.
नवाज शरीफ परतल्यावर पाकिस्तानात शांतता, विकास आणि रोजगाराच्या क्षेत्रात एका नव्या युगाचा आरंभ होणार आहे. देश मंदीच्या संकटातून बाहेर पडत अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येणार आहे. नवाज हे देशाला दहशतवादापासून मुक्त करतील. 21 ऑक्टोबर रोजी नवाज शरीफ हेच खरे नेते असल्याचे पाकिस्तानची जनता दाखवून देणार असल्याचा दावा मरियम यांनी केला आहे.
3 महिन्यांपूर्वी पाकिस्तानात तत्कालीन शाहबाज शरीफ सरकारने संसदेत ‘लाइफटाइम डिस्क्वॉलिफिकेशन’ रद्द केले होते. नव्या कायद्याच्या अंतर्गत कुठल्याही खासदाराला आता 5 वर्षांपेक्षा अधिक काळासाठी अपात्र ठरविले जाऊ शकत नाही. या निर्णयाचा थेट लाभ नवाज शरीफ यांना मिळणार आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये नवाज शरीफ यांना पनामा पेपर्स प्रकरणी अपात्र घोषित केले होते. यामुळे नवाज यांना कुठल्याही पक्षात कार्यरत राहण्याची मुभा नव्हती. तर लाहोर उच्च न्यायालयाने 2019 मध्ये नवाज यांना उपचारासाठी विदेशी जाण्यास अनुमती दिली होती. 19 नोव्हेंबर 2019 रोजी नवाज हे लंडनला गेले होते आणि तेव्हापासून ते मायदेशी परतले नव्हते.









