महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना आज सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) नेत्याला फरारी दहशतवादी दारूद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी 2022 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली होती. गेल्या सतरा महिन्यापासून तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांच्या वकिलांनी आज रात्रीपर्यंत सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या. त्यानंतर त्यांना क्रिटीकेअर रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून त्यांची ओपन जीपमधून रॅली काढण्यात आली. यावेऴी नवाब समर्थकांनी घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी केली.
यापुर्वी मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना जामिन नाकारताना मलिक यांच्या कोणत्याही अधिकाराचे उल्लंघन झाले नसून त्यांना योग्य ती “विशेष वैद्यकीय सहाय्य” मिळत आहे. तसेच त्यांना कोणत्याही गंभीर आजाराने ग्रासलेले नसल्याचे सांगून उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. तर नवाब मलिक यांच्या वकिलांनी ते क्रॉनिक किडनी आजाराने त्रस्त आहेत. तसेच त्यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून ढासळत चालली असून ती स्टेज 2 ते स्टेज 3 वर असल्याचा दावा केला होता.
मलिक यांना मिळालेल्या जामिनाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रातील मित्रपक्ष काँग्रेसने स्वागत केले. आज नवाब मलिक यांना रूग्णालयातून सोडताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
माध्यमांशी बोलकाना सुप्रिया सुळे म्हणाल्या “ज्यापद्धतीने संजय राऊत, अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली हे अतिशय वाईट आहे. देशमुख, राऊत यांना सुटका झाल्यानंतरही नवाब मलिक यांना गेल्या दीड वर्षांपासून तुरुंगात टाकले होते. आज त्यांची तुरुंगातून सुटका झाल्याने आम्हाला आनंद आहे. त्यांच्या कुटुंबांनी काय काय सहन केले, ते आम्ही सर्वांनी पाहिले असून ते बाहेर येणार असल्याने मी या ठिकाणी आले आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.