17 महिन्यांनी तुरुंगातून बाहेर पडणार : सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महाराष्ट्राचे माजी मंत्री अन् राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने मलिक यांना दोन महिन्यांचा अंतरिम जामीन वैद्यकीय कारणास्तव दिला आहे.
मलिक हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फेब्रुवारी 2022 पासून कैदेत होते. मलिक यांना 17 महिन्यांनी जामीन मंजूर झाला आहे. ईडीकडून उपस्थित सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जामीन देण्यास विरोध केला नाही.
मलिक यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याने त्यांना तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता काय हेच मला समजत नाही. मलिक यांच्यावर मागील 16 महिन्यांपासून किडनी आजारासंबंधी उपचार सुरू आहेत असे त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सुनावणीवेळी म्हटले.
वैद्यकीय आधारावर नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यास आमचा आक्षेप नाही, त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन दिला जावा असे ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.
नवाब मलिक हे न्यायालयीन अनुमतीद्वारे मागील वर्षापासून एका खासगी रुग्णालयात उपचार करवून घेत होते. मलिक यांना किडनी विकारासह अन्य आरोग्य समस्या देखील आहेत. याचमुळे त्यांना दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.









