समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यात कडाडले योगी
वृत्तसंस्था/ मैनपुरी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी उत्तरप्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले आहे. मुख्यमंत्र्यांनी येथे युवांना टॅबलेटचे वितरण केले. करहल येथे आम्ही मिनी स्टेडियम निर्माण करणार आहोत. विकासाच्या सर्व योजनांसाटी येथील नागरिकांना शुभेच्छा देत आहे. आमचे सरकार युवांना रोजगार मेळ्याद्वारे रोजगार उपलब्ध करून देत आहे. तर यापूर्वी मैनपुरीच्या विकासाकडे मागील सरकारांनी दुर्लक्षच केले होते. समाजवादी पक्षाच्या डीएनएमध्ये केवळ गुंडगिरी आहे. नवाब ब्रँड हाच समाजवादी पक्षाचा खरा चेहरा असल्याचे योगींनी म्हटले आडहे.
पूर्वी सत्तेवर असलेल्या समाजवादी पक्षाला मैनपुरीची नव्हे तर स्वत:ची चिंता होती. तर आता राज्यात कुणीच गुंडगिरी करू शकत नाही. महिलांवर कुणीच अत्याचार करू शकत नाही. उत्तरप्रदेशात आम्ही विकासाचे नवे मॉडेल सादर करत आहोत. राज्यातील मुली आणि व्यापारीही आता सुरक्षित आहेत. उत्तरप्रदेश आता देशात दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, लवकरच उत्तरप्रदेशला पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करणार आहोत असा दावा योगींनी केला आहे.









