पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर होणार करार
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी हे 13-14 जुलै रोजी फ्रान्समध्ये असतील. यादरम्यान ते फ्रान्सच्या बास्टिल डे संचलनात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान 24-30 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या अब्जावधी डॉलर्सच्या कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे. फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानांच्या नौदलासाठीच्या आवृत्तीच्या खरेदीसाठी भारत सरकार एक करार करणार असल्याचे समजते. या कराराच्या पार्श्वभूमीवर चालू आठवड्यात संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक होऊ शकते.
भारतीय नौदलाने अमेरिकेच्या एफ-18 सुपर हॉर्नेटच्या तुलनेत फ्रेंच राफेल मरीनसाठी स्वत:च्या प्राथमिकता व्यक्त केली आहे. परंतु या लढाऊ विमानाच्या किमतीबद्दल कुठलीच स्पष्टता नाही. भारतीय वायुदलासाठी यापूर्वी खरेदी करण्यात आलेल्या वेरिएंटपेक्षा ही लढाऊ विमाने स्वस्त असतील अशी अपेक्षा आहे. लढाऊ विमानांकरता खुल्या निविदेचा मार्ग स्वीकारण्याऐवजी दोन्ही देशांच्या सरकारांमधील कराराच्या माध्यमातून ही संरक्षण खरेदी होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून अधिग्रहण सोपे ठरणार आहे तसेच वेळ वाचविण्यास मदत मिळणार आहे.
दोन्ही देशांमधील करार
मोदी सरकार फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानाच्या नेव्ही वेरिएंटच्या खरेदीसाठी करार करण्याच्या तयारीत आहे. भारतीय नौदल विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांवर तैनात करण्यासाठी उपयुक्त लढाऊ विमानाचा शोध घेत आहे. नौदलाने दसॉल्टच्या राफेल मरीनची निवड केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यात भारतीय वायुदलाच्या राफेलपेक्षा 80 टक्के अधिक वैशिष्ट्यो आहेत. ताफ्याच्या समानतेमुळे प्रशिक्षण, देखभालीसाठी येणारा खर्च वाचविता येणार आहे.
राफेल एम
मागील वर्षी फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांच्या नेव्ही एडिशन आणि अमेरिकेच्या एफ/ए-18 सुपर हॉर्नेट या दोन्ही विमानांनी स्वत:च्या क्षमतेचे प्रदर्शन केले होते. भारतीय नौदलाने या दोन्ही विमानांपैकी कुठल्या विमानाची खरेदी करावी याची शिफारस करणारा अहवाल सरकारला सोपविला आहे. राफेल-एम हे आयएनएस विक्रांतवर तैनात करण्यासाठी आवश्यक शॉर्ट टेक-ऑफ आणि अरेस्टेड रिकव्हरी तंत्रज्ञानासाठी अनुकूल आहे.









