मदत-बचावकार्यासह गस्त घालण्यास मदत होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाने 76 हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया गतिमान केली आहे. या 76 हेलिकॉप्टरपैकी 51 हेलिकॉप्टर भारतीय नौदलासाठी असतील, तर उर्वरित 25 भारतीय तटरक्षक दलासाठी असतील. नौदल या हेलिकॉप्टरचा वापर सागरी शोध आणि बचाव, अपघातग्रस्तांना बाहेर काढणे, दळणवळण कार्ये आणि कमी पल्ल्याच्या सागरी हालचालींसाठी करणार आहे.
संरक्षण मंत्रालय संभाव्य भारतीय आणि परदेशी उत्पादकांकडून त्यांच्या हेलिकॉप्टरच्या क्षमता आणि पुरवठ्याच्या अटींबद्दल माहिती मागवेल. त्यानंतर या हेलिकॉप्टरच्या खरेदीसंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे. ही नवीन हेलिकॉप्टर भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या जुन्या ‘चेतक’ हेलिकॉप्टर ताफ्याची जागा घेतील. ‘चेतक’ हेलिकॉप्टर अनेक दशकांपासून देशाची सेवा करत आहेत. परंतु आता ती तंत्रज्ञान आणि ऑपरेशनल क्षमतांच्या बाबतीत जुनी झाली आहेत. अशा परिस्थितीत, नवीन हेलिकॉप्टर्स आधुनिक एव्हियोनिक्स, सेन्सर्स आणि चांगल्या दर्जाची असल्यामुळे ती सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार असतील. तसेच ती 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यांची घुसखोरी रोखण्यासाठीही मदतगार ठरण्याची अपेक्षा आहे.
‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत खरेदी
नव्या हेलिकॉप्टर्सचा व्यवहार ‘खरेदी (भारतीय-आयडीडीएम)’ श्रेणी अंतर्गत वर्गीकृत करण्यात आला आहे. या श्रेणीचा अर्थ ‘भारतीय – स्वदेशी डिझाइन विकसित आणि उत्पादित’ केलेले असा होतो. अर्थातच ही नवी हेलिकॉप्टर स्वदेशी डिझाइन, विकसित आणि उत्पादित केली जाणार आहेत.









