विंगमन’सारखे काम करणार : एअरो इंडिया-2025 मध्ये पहिले मॉडेल सादर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय नौदल आणि न्यू स्पेसने एक विशेष लढाऊ ड्रोन एन-सीसीएव्ही (नौदल सहयोगी लढाऊ हवाई वाहन) तयार करण्याची योजना सुरू केली आहे. हे ड्रोन नौदलाच्या लढाऊ विमानांसोबत सेवेत उतरणार असून मिग-29के आणि भविष्यातील राफेल-एम सारख्या विमानांसह मानव-मानव रहित टीमिंगमध्ये (एमयुएमटी) उड्डाण करेल. या निष्ठावंत विंगमनचे नाव ‘अभिमन्यू’ असे आहे. नुकत्याच बेंगळूरमध्ये आयोजित एअरो इंडिया-2025 मध्ये ‘अभिमन्यू’चे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते.
एन-सीसीएव्ही हे लढाऊ विमान ‘अभिमन्यू’ बनून देश रक्षणासाठी सज्ज होणार आहे. ते वैमानिकांना सहाय्यक म्हणून काम करेल. तसेच शत्रूवर लक्ष ठेवण्यास, धमक्या ओळखण्यास, हल्ला करण्यास आणि इलेक्ट्रॉनिक युद्धासारख्या मोहिमा पार पाडण्यास मदत करेल. हे ड्रोन भारतीय स्टार्टअप न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज (एनआरटी) द्वारे विकसित केले जाईल. हे नवीन ड्रोन ‘अभिमन्यू’ नावाच्या जेट-चालित ड्रोन डिझाइनवर आधारित असेल. ते लांब अंतरापर्यंत उड्डाण करण्यासोबतच वेगाने हल्ला करू शकेल आणि शत्रूला चकमा देऊ शकेल, असे सांगण्यात आले.
ड्रोन कधी मिळेल?
नौदलासोबत करार झाल्यानंतर 12 महिन्यांनी पहिला प्रोटोटाइप तयार होईल. अंतिम प्रोटोटाइप 30 महिन्यांनंतर भारतीय नौदलाकडे सोपवला जाईल आणि अंतिम ड्रोन 36 महिन्यांनंतर भारतीय नौदलाकडे सोपवला जाईल, असे सांगितले जात आहे. हे लढाऊ विमान कॅटपल्ट लाँच सिस्टीम वापरून उड्डाण करेल. हे तंत्रज्ञान नंतर आणखी अपग्रेड केले जाऊ शकते. भारतीय नौदल पुढील काही वर्षांत एन-सीसीएव्ही ड्रोन आपल्या ताफ्यात समाविष्ट करेल. ‘अभिमन्यू’च्या समावेशामुळे आधुनिक युद्धभूमी अधिक मजबूत होईल. तथापि, स्वदेशी नौदलाच्या लढाऊ विमानांची अजूनही खूप प्रतीक्षा आहे.
‘अभिमन्यू’ ची खास वैशिष्ट्यो
रेंज : सुमारे 1,000 किमी
ऑपरेशन वेळ : 20 तासांपर्यंत
वेग : सुमारे 550 किमी/तास
सेन्सर : इलेक्ट्रो-ऑप्टिक/इन्फ्रारेड कॅमेरा
ध्येय : हवेतून हवेत व जमिनीवर हल्ला









