सागरी क्षेत्राची देखरेख होणार अचूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्वदेशी शस्त्रप्रणालीला चालना देत भारतीय नौदल चार तपस ड्रोन खरेदी करणार आहे. याकरता लवकरच आदेश काढला जाणार आहे. तपस ड्रोनला संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. नौदल सागरी क्षेत्रावर देखरेखीसाठी या ड्रोनचा वापर करणार आहे.
नौदल 4 तपस ड्रोन्सची ऑर्डर देणार आहे. ड्रोनची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) आणि हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) संयुक्त उपक्रमाकडून केली जाणार आहे. करारावर स्वाक्षरी केल्याच्या 24 महिन्यांच्या आत पहिला ड्रोन पुरविला जाणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
तपस ड्रोन परीक्षणांमध्ये अद्याप संरक्षण दलांच्या आवश्यकता पूर्ण करण्यास सक्षम ठरले आहे., तर डीआरडीओकडून तपसला आणखी अत्याधुनिक स्वरुप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपस ड्रोनचे परीक्षण संरक्षण दलांकडून करण्यात आले आहे. परीक्षणादरम्यान तपस ड्रोन 28 हजार फुटांच्या उंचीपर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरले आणि 18 तासांपेक्षा अधिक काळापर्यंत उड्डाण करण्यास ते सक्षम होते. तपस ड्रोनचा वापर बेटक्षेत्र आणि मुख्य भूमीच्या काही छोट्या हवाईक्षेत्रांवरून केला जाऊ शकतो.









