नागरिकांमुळे मध्यरात्री तणाव, आमदार व प्रशासनाकडून धोक्याची पाहणी, महिनाभरात सुरक्षा उपाययोजनांचे आश्वासन

वास्को : मागच्या वर्षभरापासून धोकादायक म्हणून ओळखल्या गेलेल्या वास्कोतील वरूणापुरी मांगोरहिल नाक्यावर अखेर रविवारी रात्री जीव घेणा अपघात घडला. मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने नौदलाचा कर्मचारी जागीच ठार झाला. मयताचे नाव अरविंद पासवान(31) असे आहे. या अपघातानंतर प्रशासन खडबडून जागे झालेले असून सदर नाक्यावरील धोका दूर करण्यासाठी स्थानिक आमदार दाजी साळकर यांच्यासमवेत सोमवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास वरूणापुरी नाक्यावर झाला. मुरगाव बंदरातून माल घेऊन बाहेर पडलेला अवजड ट्रक हेडलॅण्ड सड्यावरून नवीन महामार्गाने वरूणापुरी नाक्यावरून दाबोळीमार्गे वेर्णाच्या दिशेने जाणार होता. मात्र, धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूणापुरी नाक्यावर ट्रकने दुचाकी चालकाला ठोकरले. हा दुचाकीचालक बाजुच्या रस्त्यावर दुचाकी पार्क करून बसला होता. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने ट्रक मुख्य रस्त्यावरून बाहेर आला व दुचाकीला ठोकरले. त्यामुळे नौदलाचा कर्मचारी असलेला अरविंद पासवान हा युवक ठार झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, त्याला मृत घोषीत करण्यात आले.

वर्षभरात कार व अवजड वाहनांच्या धडकेने चौघांचा मृत्यू
साधारण महिनाभरापूर्वीच या नाक्यापासून अवघ्या काही अंतरावर कारने ठोकरल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. तीथूनच काही अंतरावर साधारण चार महिन्यांपूर्वी कारच्या ठोकरीने आणखी एका महिलेचा मृत्यू झाला होता. साधारण वर्षभरापूर्वी वरूणापुरी नाक्याशेजारीच गांधीनगरच्या दिशेने टँकरच्या धडकेने चिखलीच्या माजी सरपंचाच्या मुलाला मृत्यू आला होता. वारंवार घडणाऱ्या अशा अपघातांमुळे शांतीनगर ते वरूणापुरी नाक्यापर्यंतच महामार्ग धोकादायक ठरलेला आहे.
अपघातामुळे मध्यरात्री तणाव, आमदारांनी दिली भेट
रविवारी रात्री वरूणापुरी नाक्यावर ट्रकच्या धडकेने निष्पाप नौदल कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने या परीसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. त्यामुळे पहाटे दोन वाजेपर्यंत या भागात तणाव होता. वरूणापुरी नाका पूर्णपणे धोकादायक असून त्या ठिकाणी जोपर्यंत सुरक्षा उपाययोजना आखण्यात येत नाहीत, तोपर्यंत मालवाहतुक करू दिली जाणार नाही असा ईशारा अपघातस्थळी जमलेल्या जमावाने दिला. गेले वर्षभर या रस्त्यावरून मालवाहू होत आहे. वाहनांची मोठी संख्या व दाट लोकवस्ती या ठिकाणी असल्याने आणि वरूणापुरी नाक्याचा आकार अगदीच छोटा असल्याने या ठिकाणी जीव घेणे अपघात घडू शकतात, कल्पना देऊनही आणि अवघ्या काही अंतरावर जीवघेणे अपघात घडूनही प्रशासनाने सुरक्षेचे कोणतेही उपाय योजले नाहीत व शेवटी याच नाक्यावर युवकाला नाहक जीव गमवावा लागल्याच्या प्रतिक्रया मध्यरात्री स्थानिक युवकांनी व्यक्त केल्या. या अपघाताची माहिती मिळताच वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनीही प्रशासनाने केलेल्या अशभ्य दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला. या प्रश्नावर तोडगा काढण्याचे त्यानी आश्वासन दिले. कायदा हातात न घेण्याचे आवाहनही त्यांनी जमावाला केले. आमदारांनी रात्रीच या अपघाताची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली व त्वरीत उपाययोजना करण्याचा आवश्कता व्यक्त केली.
आमदार, नौदल व शासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी, महिनाभरात सुरक्षा उपाययोजना करण्याचे आश्वासन
गेले वर्षभर गंभीर धोक्याचे सावट पसरलेल्या वरूणापुरी नाक्यावरच अखेर एकाचा नाहक जीव गेल्याने काल सोमवारी प्रशासन खडबडून जागे झाल्याचे दिसले. सोमवारी सकाळपासून पोलिसांनी या नाक्यावरील वेशिस्तीवर कडक नियंत्रण ठेवले. दुपारी स्थानिक आमदार दाजी साळकर यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विल चंद्रू, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली, पोलीस उपअधीक्षक सलीम शेख, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, भारतीय नौदल व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व इतर अधिकाऱ्यांयच समवेत वरूणापुरी नाक्याची पाहणी केली. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे काही वेळ चर्चा केली. सुरक्षेच्या उपाययोजनाबाबत चर्चा झाली. या नाक्यावर नौदलाच्या प्रवेशव्दारासमोरच नौदलाचे अतिक्रमण असल्याने ते काढण्याचीही मागणी नागरिकांनी केली. नाक्यावर सिग्नल यंत्रणा, गती रोधक तसेच वाहतुक बेटाचा आकार कमी करणे व इतर सुरक्षाविषय सुचना नागरिकांनी केलेल्या असून मालवाहू चालकांची बेशिस्ती तसेच त्यांच्याकडून होणारे प्रदुषण व क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतुक करणे असे प्रश्नही लोकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. वरूणापुरी नाक्यावरील धोक्याची गंभीर दखल घेण्यात आलेली असून महिनाभरात सुरक्षाविषयक उपाययोजना होईल असे आमदार दाजी साळकर यांनी म्हटले आहे. रविवारी रात्री घडलेल्या अपघातात नौदलाच्या कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागल्याने नौदलाने नाक्यावरील धोका दूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.









